□ निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात होणार वाढ
सोलापूर – महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने मांजरी येथील प्रयोगशाळेच्या प्रक्षेत्रावर सुगंधी लाल रंगाच्या द्राक्षाचे नवे वाण विकसित केले आहे. या लाल रंग असलेल्या वाणाचा स्वत:चाच एक सुंगध आहे. रंग, चव, वजन आणि टिकाऊपणाच्या बाबतही हे वाण दर्जेदार आहे. ‘new variety’ of aromatic red grape developed; Yash Cat Lab for the Grape Growers Association
मांजरी येथील प्रक्षेत्रावर या वाणाची चाळीस झाडे आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून या वाणाच्या संशोधनाचे काम सुरू होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन उत्कृष्ट रंग, उत्कृष्ट चव, चांगली वजनदार आणि सुवासिक द्राक्ष प्रजाती विकसित करण्यात द्राक्ष बागाईतदार संघास यश आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महाराष्ट्राच्या विविध भागांत, वेगवेगळ्या भौगोलिक आणि वातावरणात या वाणाची चाचणी व्हावी या उद्देशाने मांजरी फार्म येथील प्रयोगशाळेसोबतच बागाईतदार संघाच्या काही प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रयोगासाठी सदर वाणाची काही झाडे देण्यात आली होती. भारत शिंदे (अध्यक्ष, पुणे विभाग), अभिषेक कांचन (उरुळी कांचन) आणि अशोक गायकवाड (नाशिक) यांनी या नव्या वाणाची चाचणी घेतली आहे. त्यांच्याकडून वाणाबाबत समाधानकारक अभिप्राय प्राप्त झाले आहेत. या चाचणीदरम्यान प्राप्त झालेल्या अभिप्राय आणि सूचनांचा अभ्यास करून या वाणात अजून काही सुधारणांची शक्यताही तपासली जाणार आहे.
महाराष्ट्रातील द्राक्षांना जगभरातून मागणी असते. तरीही महाराष्ट्रातील एकूण द्राक्ष उत्पादनांपैकी फक्त आठ टक्के माल निर्यात होतो. सुधारित वाणांच्या वापराने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात भरघोस वाढ होईल. नव्याने विकसित करण्यात आलेले वाण सध्याच्या क्रीमसन जातीपेक्षाही सुधारित आहे. हे वाण दर्जेदार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी राहील. तळेगाव वणी (जि. नाशिक) येथील प्रक्षेत्रावर सुमारे एक हजार झाडांचा मळा उभारण्यात आला आहे. पुढील हंगामात ही द्राक्षे शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध होतील, असे शिवाजीराव पवार (अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ) यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीनुसार चांगल्या रंग, चव, वजनाची आणि सुवासिक द्राक्ष प्रजात द्राक्ष बागाईतदार संघाने विकसित केली आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनाला यश प्राप्त झाले आहे. या प्रजातीचे नामकरण करून लवकरच द्राक्ष बागाईतदारांना उपलब्ध करून देण्यात येईल, असे चंद्रकांत लांडगे (अध्यक्ष, विज्ञान समिती) यांनी सांगितले.