स्व. बाळासाहेब ठाकरे. ज्वलंत हिंदुत्वाचा धगधगता निखारा. मुंबईतील मराठी माणसाचा मानबिंदू. कुंचल्याच्या फटकार्यातून भल्याभल्यांचा पळता भूई थोडी करणारा जितका मिस्कील तितकाच जहाल व्यंगचित्रकार. Shiv Sena established by breaking coconut in the presence of only 18 people… Yesterday… Today… Tomorrow Poignant Balasaheb Thackeray एकीकडे कुंचल्याचा फटका आणि दुसरीकडे शब्दांचा तडाखा असा तुफान सपाटा सुरू असलेला एक मंतरलेला काळ.
जेवढी ताकद कुंचल्यात होती; किंबहुना त्यांच्याजवळ होती ती काळ्या पाषाणालाही उभा-आडवा चिरणार्या शब्दांची ताकद. त्यामुळे झाले काय? तर मुंबईतील मराठी लोक बाळासाहेब नावाच्या अफलातून रसायनाजवळ येऊ लागले. बाळासाहेब त्यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ बनले. बाळासाहेब त्यांच्यासाठी हक्काचा मराठी माणूस बनले. हाच मराठी माणूस एक एक करत ते जोडत गेले, संघटन तयार होत गेले आणि शिवसेना नावाच्या संघटनेची जन्म झाला.
तीच ती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. फक्त 18 लोकांच्या उपस्थितीत नारळ फोडून मुंबईतील एका छोट्याशा इलाख्यात सुरू झालेली शिवसेना पुढे जाऊन महाराष्ट्रात सत्तेवर आली. तीच शिवसेना; गेल्या आठ महिन्यांपूर्वी बंड झाले आणि शिवसेना फुटली. शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवरून पायउतार झाला. ती तीच शिवसेना, जी निवडणूक आयोगाने बंडाचे प्रणेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल केली.
शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण गेल्या 56 वर्षात कधीही तुटले नव्हते. तशी शिवसेनेने अनेक वादळे पाहिली. अनेक चढ-उतार अनुभवले. शिवसेनेत किती आले आणि गेले. शिवसेना संपवण्याची भाषा करणारे बाळासाहेबांच्याच हयातीत अनेकजण संपले. अनेक संकटे आली. तरी एखाद्या पहाडासारखे बाळासाहेब अटल राहिले आणि शिवसेनेला अभेद्य ठेवले. शिवसेना संपवण्याची भाषा करणार्यांनाच शिवसेनेच्या बाणाने भेदले. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे आदेश. बाळासाहेबांचा आदेश म्हणजे कायदा. बाळासाहेब बोलले म्हणजे कोणत्याही परिस्थितीत माघार नाहीच. विचार करून बोलणार नव्हे तर बोलल्यानंतर अनेकांना विचार करायला लावणारा नेता म्हणजे बाळासाहेब.
प्रसंगी कशाचीही पर्वा न करता निर्णय घ्यायचे आणि निर्णय घेतल्यानंतर ते कधीही कशाचीही पर्वा करायचे नाहीत. बाळासाहेबांचा दराराच इतका प्रचंड की त्यांच्यासमोर दिल्लीश्वर कधीच वर मान करून बोलले नाहीत. बाळासाहेब पाठीशी असल्यानंतर दिल्लीश्वर कुणासमोरही झुकले नाहीत. काल त्याच बाळासाहेबांच्या पश्चात त्यांच्याच शिवसेनेत बंड झाले आणि आज ठाकरे व शिवसेना हे अतूट समीकरण पहिल्यांदाच तुटले.
● शिवसेनेला जन्म देणार्या ‘मार्मिक’चा जन्म
बाळासाहेब हे हाडाचे व्यंगचित्रकार. त्यांच्या कुंचल्यात विलक्षण ताकद होती. त्यांच्या कुंचल्याच्या फटकार्यातूनच मी मी म्हणणारे अक्षरश: घायाळ होत. केवळ व्यंगचित्राला वाहिलेले एक वृत्तपत्र असावे, या विचाराने बाळासाहेबांनी 1960 साली मुंबईमध्ये एक साप्ताहिक सुरू केले. त्याचेच नाव ‘मार्मिक’ असे ठेवले. त्या दरम्यान संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली होती. मराठी माणसांच्या प्रश्नांवर बाळासाहेबांची व्यंगचित्रे जोरदार प्रहार करत होती. मुंबईतील मराठी माणसांवर अन्याय चालू होता. त्या अन्यायाला ‘मार्मिक’ने वाचा फोडली. ‘मार्मिक’मुळे खर्या अर्थाने बाळासाहेबांचे संघटन सुरू झाले. त्याच संघटनातून पुढे शिवसेनेचा जन्म झाला.
● वाचा आणि थंड बसा
बाळासाहेब जसे ख्यातीचे व्यंगचित्रकार तसे हाडाचे पत्रकारही होते. शिवाय ते फर्डे वक्तेही होते. भाषणाची त्यांची स्वत:ची अशी एक ठाकरी शैली होती. ‘मार्मिक’मधील अणकुचीदार कुंचला आणि धारदार लेखी, मोकळ्या मैदानातील सभांमध्ये बरसणारी वादळी ठाकरी शैली यामुळे मराठी माणूस बाळासाहेबांभोवती गोळा होऊ लागला.
‘मार्मिक’चे कार्यालय बाळासाहेबांचे घर म्हणजे मराठी माणसांची पंढरी बनले. त्याकाळी बाळासाहेबांनी सुरू केलेले ‘मार्मिक’मधील ‘वाचा आणि थंड बसा’ हे सदर मुंबईमध्ये धुमाकूळ घालत होते. त्यातून बाळासाहेबांभोवती गोळा झालेल्या मराठी माणसांचे संघटन करण्यासाठी एका संघटनेची गरज होती. तशी ती अनेकांनी बोलूनही दाखवली होती. खुद्द प्रबोधनकार ठाकरेंनीसुध्दा बाळासाहेबांना मराठी माणसांची संघटना काढण्याचे सुचवले होते. तिथूनच शिवसेनेच्या स्थापनेची वाटचाल सुरू झाली.
● शिवाजीची सेना… शिवसेना
बाळासाहेबांना बहुतांश लोकांनी राजकीय पक्ष स्थापनेचा आग्रह धरला होता. मात्र बाळासाहेबांनी पक्ष नव्हे तर संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मराठी माणसांचे रक्षण करणारी मराठी संघटना स्थापन करण्याचा विचार बाळासाहेबांनी पक्का केला. हे जेव्हा प्रबोधनकारांना समजले; तेव्हा त्यांनी त्यांनी नाव सुचवले ‘शिवसेना… शिवाजीची सेना… म्हणजेच शिवसेना.’
प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी महाराष्ट्र भ्रमण केले होते. त्यात त्यांना छत्रपती शिवराय आणि मराठी माणूस यांचे नाते जवळून पाहिले होते. मराठी माणसांच्या मनात शिवरायांविषयी असलेली भावना ‘शिवसेना’ या नावातून संघटनेत ओतण्याची ती प्रबोधनकारांची संकल्पना होती. नुसते ‘शिवाजी महाराज की जय’ म्हटल्याबरोबर मराठी माणसांच्या रोमारोमात स्फुलिंग प्रज्वलित होते; ते स्फुरण पाहूनच प्रबोधनकारांनी बाळासाहेबांच्या संघटनेला शिवरायांची सेना म्हणे ‘शिवसेना’ हे नाव दिले.
● दि.19 जून 1966
तो दिवस होता दि. 19 जून 1966 चा. खुद्द बाळासाहेब आणि त्यांचे दोन बंधू आणि प्रबोधनकार असे ठाकरे कुटुंबातील चौघे आणि अन्य 14 निवडक व विश्वासू लोक बाळासाहेबांच्या घरी एकत्र जमलेले. नाईक नावाच्या बाळासाहेबांच्या एका सहकार्याने गल्लीतीलच एका दुकानातून एक नारळ आणलेला. बरोबर सकाळी साडेनऊ वाजता प्रबोधनकारांनी नारळ फोडला आणि उपस्थित 18 लोकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा दिली अन् शिवसेनेची स्थापना झाली.
तीच शिवसेनेच्या स्थापनेची घोषणा होती. तीच घोषणा आजही कायम आहे. त्यानंतर लगेच ‘मार्मिक’मधून शिवसैनिकांची नोंदणी सुरू असल्याचे प्रसिध्दीकरण करण्यात आले. त्या दिवशी ‘मार्मिक’च्या कार्यालयावर तुडुंब गर्दी लोटली. बघता बघता शिवसेनेचे तब्बल दोन हजार पोस्टर्स अवघ्या तासाभरात संपले. पहिल्याच महिन्यात वीस हजार शिवसैनिकांची अधिकृत नोंद झाली. त्यानंतर शिवसेना ही मुंबईतील घराघरात आणि मराठी माणसांच्या मनामनात जाऊन पोहचली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● शिवाजी पार्कवरचा पहिला मेळावा
दि.19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर शिवसैनिकांची नोंदणी सुरू झाली. पुढे दसरा आला. दसर्याचा मुहूर्त साधून बाळासाहेबांनी दि.30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्याचे जाहीर केले. हा शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा. या मेळाव्याला त्यावेळी पाच लाखांपेक्षा अधिक मराठी माणसांचा जनसागर लोटला होता. याच मेळाव्यात 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचे धोरण बाळासाहेबांनी जाहीर केले. तेव्हापासून पुढील 57 वर्षे एक मैदान, एक पक्ष आणि एक नेता हे समीकरण शिवाजी पार्कशी तयार झाले. त्याच शिवाजीपार्कला पुढे शिवतीर्थ असे संबोधले गेले.
● राजकारणात प्रवेश
सन 1967 साली ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लागली. या निवडणुकीत शिवसेनेला उतरवण्याचा निर्णय बाळासाहेबांनी जाहीर केला. हा निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेचा राजकारणात प्रवेश होता. पुढच्याच वर्षी म्हणजे 1968 साली शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला. तिथून शिवसेनेच्या शाखा विस्ताराला सुरुवात झाली.
● शिवसेनेचे पहिले आमदार
दि. 5 जून 1970 साली कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण हादरले. त्यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत बाळासाहेबांनी वामनराव महाडिक यांना शिवसेनेची उमेदवारी दिली. शिवसेनेने ही निवडणूक ताकदीने लढवली. यामध्ये महाडिक विजयी झाले आणि शिवसेनेचा पहिला आमदार म्हणून वामनराव महाडिक राज्याच्या विधिमंडळात दाखल झाले.
● शिवसेनेचे पहिले महापौर
पुढच्याच वर्षी म्हणे 1971 मध्ये शिवसेनेने मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली. त्यावेळी महापालिकेत शिवसेनेची सत्ता स्थापन झाली. डॉ. हेमचंद्र गुप्ते हे मुंबई महापालिकेचे शिवसेनेचे पहिले महापौर झाले. त्यानंतर 1972 साली विधानसभेत प्रमोद नवलकर यांनी प्रवेश केला. सन 1973 मध्ये सतीश प्रधान ठाणे महापालिकेचे महापौर बनले. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली. त्यानंतर अनेक महापौर झाले. सन 1996 पासून मुंबई महापालिका ही शिवसेनेच्याच ताब्यात आहे.
● शिवसेनेची युती
शिवसेनेने कॉंग्रेसबरोबर अनेक वेळा मैत्री केली. 1980 साली कॉंग्रेसला मदत केल्याने शिवसेनेला विधानपरिषदेच्या दोन जागा मिळाल्या. 1984 मध्ये भाजपबरोबर शिवसेनेने युती केली. ती तब्बल 25 वर्षे टिकली. सन 2014 साली ही युती तुटली. शिवसेना आणि भाजपने स्वबळावर विधानसभा लढवली. निवडणुकीनंतर पुन्हा युती झाली. मात्र सन 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती निवडणुकीनंतर तुटली.
● शिवसेनेचे मुख्यमंत्री
सन 1995 मध्ये सेना-भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले. त्यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशी यांना शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. याच काळात शेवटचे काही महिने शिवसेना नेते नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले. पुढे सन 2014 मध्ये पुन्हा सेना-भाजपचेच सरकार सत्तेवर आले. तेव्हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला. म्हणजेच युतीचे तिसरे मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस झाले.
● शिवसेना सोडणारे नेते
शिवसेनेतील छगन भुजबळ, नारायण राणे यांनी शिवसेनेला कायमचा राम राम केला. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी देखील शिवसेना सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला. हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, राम जेठमलानी, चंद्रिका कोनिया यांसारख्या अनेक नेत्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला.
● शिवसेनेचा वाघ गेला
दि.17 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबईतील ‘मातोश्री’ या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. निधन झाल्याने पक्षाची सर्व जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर आली. त्याचबरोबर उध्दव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख आणि ‘सामना’चे संपादक झाले. परंतु मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची नेमणूक झाल्यानंतर, ’सामना’ची सर्व जबाबदारी रश्मी ठाकरे यांना देण्यात आली.
● पक्षाला पक्षाघात
कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रथम पक्ष, त्यानंतर कार्यकर्ता आणि नेता अशी उतरंड असते. मात्र पक्षामध्ये जेव्हा पक्षहितापेक्षा नेत्यांचे स्वहित मोठे होते; तेव्हा त्या पक्षाला पक्षाघात होतो. तो पक्ष हा पक्ष राहत नाही. पक्षात फुटीरता निर्माण होते. पक्ष फुटतो. कोणी कितीही आणि काहीही म्हटले तरी त्याचा फटका पक्षाला बसतोच. शिवसेना फुटीमध्येही नेमके हेच झाले. जेव्हा जेव्हा पक्षहितापेक्षा पक्षातील नेत्यांना स्वहित मोठे वाटू लागले; तेव्हा तेव्हा शिवसेना फुटली. पक्षहितापेक्षा स्वहित मोठे करू पाहणारे नेते शिवसेनेतून बाहेर पडले. नाही म्हटले तरी याचा फटका ज्या त्या वेळी शिवसेनेला बसला. पण प्रत्येकवेळी शिवसेना सावरली. पक्षाची पडझड रोखता आली. त्यामुळे पक्ष वाचला.
● हमे तो अपनो ने लुटा…
बाळासाहेबांनंतर उध्दव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे आली. बाळासाहेबांच्या निधनानंतर सन 2014 साली झालेल्या निवडणुकीपूर्वी सेना-भाजप युती तुटली. ‘हिंदुत्व’ हा युतीचा समान धागा होता. याच धाग्यातून निवडणुकीनंतर सेना-भाजप पुन्हा युतीमध्ये एकत्र आले. मात्र या पाच वर्षांच्या सत्ताकाळात कोणी कोणाला फसवले? हे सेना आणि भाजपवाल्यांनाच माहीत. दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात.
सन 2019 च्या निवडणुकीत एकत्र असलेले हे दोन्ही पक्ष निवडणुकीनंतर वेगळे झाले आणि शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेससोबत आघाडी करत सत्ता हस्तगत केली. पक्ष मोठा करण्यासाठी ते आवश्यक होते म्हणून उध्दव ठाकरे यांनी ते केले. पण शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण घट्ट असल्यामुळे शिवसेनेत राहून उध्दव ठाकरे यांना टाळून मोठे होणे शक्य नव्हते. त्यातून बाळासाहेबांच्या विचारसरणीचे कारण पुढे करून शिवसेनेत बंड झाले. त्यातून शिवसेना फुटली. पुढे हा मामला सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगात पोहचला. राज्यघटनेनुसार स्वायत्त असणार्या निवडणूक आयोगाने शिवसेना-ठाकरे हे समीकरण तोडले आणि ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या हवाली केली.
● पुढे काय…?
शेवटी उध्दव ठाकरे हेसुध्दा ठाकरेच आहेत. त्यांच्याही अंगात शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचेच रक्त आहे. भलेही त्यांच्या काही चुका झाल्या असतील. त्यातून बाळासाहेबांची शिवसेना त्यांच्या हातून निसटली असेल. पण गप्प बसेल तर ते ठाकरेंचे रक्त कसले? शेवटी शिवसैनिक हा शिवसेनेचा श्वास आहे. हा शिवसैनिक कडवा आहे. त्याची बांधीलकी शिवसेनेशी आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आता ठाकरेंकडे राहिली नाही. म्हणून शिवसैनिकांची ती बांधीलकी शिवसेना-ठाकरे या समीकरणाशी राहते की शिवसेनेशी जोडली जाते? हे येणार्या निवडणुकीतच समजणार आहे.
☆ संकलन व संपादन :
ॲड. राजकुमार नरुटे