मोहोळ : मोहोळ तालुक्यात कोन्हेरी परिसरातील एका बागेत बिबट्या सदृष्य प्राणी दिसून आला, तर माने वस्ती येथील विठ्ठल लवटे येथ बोकडांवर हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. Mohol: Leopard-like animal found in Konheri area, Solapur Madha Karmala
गेल्या चार वर्षापासून प्रत्येक वर्षी याच दिवसांमध्ये करमाळा, माढा सह मोहोळ तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ चालू असतो. याच पार्श्वभूमीवर यावर्षीही मोहोळ तालुक्यात फेबुवारीमधे बिबट्याचा वावर आढळून आला आहे. गुरुवारी (दि.२३ ) वाफळे परिसरात दिसल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी कोन्हेरी येथील जरग वस्ती परिसरात नागरिकांना बिबट्या सदृष्य प्राण्याचे दर्शन झाल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे तर माने वस्ती येथील विठ्ठल लवटे यांच्या बोकडांवर हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोन्हेरी परिसरात बिबट्या आढळल्याची माहिती मिळताच तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश उटगी यांनी परिसरात गस्त लावण्यात आली असल्याचे सांगितले. या शिवाय नाईट पेट्रोलिंग सुरू केली असून शेतकऱ्यांना काही आढळून आल्यास तातडीने वनखात्याशी संपर्क साधावा व शेतकऱ्यानी सावधगिरी बाळगावी, शेतात कामे करताना सावधानता बाळगावी, लहान मुले व महिलांना एकटे सोडू नये, बिबट्या एकाच भागात जास्त दिवस राहत नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन मोहोळ तालुक्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश उटगी यांनी केले आहे.
》 करमाळा, माढा परिसरात बिबट्याचा वावर; शेळ्यांवर हल्ला
सोलापूर : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक, रोपळे खुर्द, वडाचीवाडी (उ.बु.) परिसरात बिबट्यासदृश्य प्राण्याचे दर्शन नागरिकांना होत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून, वाड्यावस्त्यांवरील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी करमाळा तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. आता माढा तालुक्याच्या परिसरात वावर असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. रोपळे खुर्द परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी दिसून आल्यानंतर वडाचीवाडी व उपळाई बुद्रूक भागातील नागरिकांना हा प्राणी दिसून येत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वावर असलेल्या परिसरास भेट देऊन पाहणी केली असता बिबट्याचेच ठसे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बिबट्याचा शोध घेऊन वनविभागाने जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
याबाबत वनरक्षक सुरेश कुरळे म्हणाले की, शेतात कामे करताना सावधानता बाळगावी. लहान मुले व महिलांना एकटे सोडू नये. उपळाई परिसर हा कोरडवाहू भाग असल्याने दोन ते तीन दिवसांत बिबट्या या भागातून निघून जाईल परंतु तोपर्यंत नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी.
करमाळा तालुक्यात बिबट्याचे नाव जरी काढले तरी जुन्या आठवणींनी जीवाची घालमेल होते. कारण सन २०२० साली नगर जिल्ह्यात नऊ जणांचा बळी घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने चार दिवसांत करमाळ्यातील तिघांचा बळी घेतला होता. आता पुन्हा तालुक्यातील गावांमध्ये बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे आणि शेळ्यांवर हल्ले करत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. गेल्या दोन दिवसांत निंभोरे, देवळाली, वीट या ३० किलोमीटरच्या परिघात बिबट्याचे दर्शन झाले असून, दोन ठिकाणी शेळीवर हल्ला झाला.
शेतातील ठसे पाहून बिबट्याच असल्याचे वन विभागाने जाहीर केले आहे. बिबट्या घाबरट प्राणी असून, संध्याकाळच्या वेळेस प्रखर प्रकाश, संगीत यांचा वापर करा. जवळ काठी बाळगा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
□ दोन वर्षांपूर्वी तिघांचा बळी
सन २०२० साली नगर जिल्ह्यात नऊजणांचा बळी घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने चार दिवसांत करमाळ्यातील तिघांचा बळी घेतला होता. अंजनडोह येथील एका महिलेचे शिर धडावेगळे केले होते. लिंबेवाडी येथील शेतकऱ्यावर हल्ला करून जीव घेतला होता, तर चिखलठाण येथे उसाच्या फडातून नऊ वर्षांच्या चिमुरडीला सर्वांदेखत उचलून फरफटत चालवले होते. मात्र, ऊसतोड कामगारांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने मुलीला सोडले होते. मात्र, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. बिबट्याने माणसांबरोबर वासरे, शेळ्या यांचादेखील फडशा पाडला होता. अखेर वांगी येथे केळीच्या फडात या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वन विभागाला यश आले होते. यानंतर २०२१ मध्येदेखील बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र, -आता दोन वर्षांनी तालुक्यात पुन्हा बिबट्याचा वावर सुरू झाल्याने घबराट पसरली आहे.
“बिबट्या घाबरट प्राणी आहे. भक्ष्याच्या शोधात तो गावात प्रवेश करत आहे. त्यामुळे रात्री गुरांच्या गोठ्यांभोवती प्रखर प्रकाश करा. हातात टॉर्च व मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावा. बिबट्या दिसताच मोठमोठ्याने गोंगाट करा.”
– धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक