सोलापूर : हिंदूत्वाचे कट्टर पुरस्कर्ते संभाजी भिडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आ. श्रीकांत भारतीय यांच्या भेटीमुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात चर्चेत आलेले उदयशंकर पाटील यांनी आता राजकीय दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. त्यांनी पुढील राजकीय दिशा आणि धोरण ठरवण्यासाठी नुकतेच त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली होती. Udayashankar Patil’s lotus will bloom soon; South Solapur will clarify the intention on March 9
विविध मान्यवरांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत उदयशंकर पाटील यांनी हिंदुत्ववादी विचाराशी समरस असलेल्या राजकीय पक्षाबरोबर जावे, असा सूर व्यक्त करण्यात आला. त्यामुळे उदयशंकर पाटील हे भाजपच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
सन 2004 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्याविरुद्ध दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उदयशंकर पाटील यांनी जोरदार लढत दिली होती. त्यावेळी तब्बल त्यांनी 28 हजार मते घेतले होते. त्यामुळे दक्षिण तालुक्याला एक युवा नेता मिळणार अशी त्यावेळी चर्चा होती. मात्र काही कारणांमुळे उदयशंकर पाटील राजकारणापासून अलिप्त राहिले.
मात्र त्याच दरम्यान त्यांनी दादाश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते राजकारणात उतरतील, अशी चर्चा सुरू होती. त्यांचे समर्थक वेळोवेळी सोशल मीडियाद्वारे ते स्पष्ट करत होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि आगामी लोकसभेची जबाबदारी ज्यांच्यावर दिली आहे असे आमदार श्रीकांत भारतीय यांनी उदयशंकर पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांना थेट भाजप प्रवेश प्रवेशाचे आमंत्रण दिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यापूर्वीही हिंदू धर्माचे कट्टर समर्थक असलेले संभाजी भिडे यांनीही उदयशंकर पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यावरूनच उदयशंकर पाटील हे हिंदू विचाराशी समरस असलेल्या पक्षाबरोबर जाणार हे स्पष्ट झाले होते. श्रीकांत भारतीय यांनी उदयशंकर पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर उदयशंकर पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का याबाबत चर्चा सुरू झाली. ते शहर उत्तर मधून आपले नशीब आजमावणार की शहर दक्षिणची वाट धरणार याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
एकंदरीत पाहता उदयशंकर पाटील हे भाजपची जवळीक साधणार हे जवळपास निश्चित होत आहे. या चर्चांना अधिक आणण्याचे काम त्यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या त्यांच्या समर्थकांच्या आणि हितचिंतकाच्या बैठकीने केले. शनिवारी आगामी काळातील समस्त पाटील कुटुंबाची व पाटील समर्थकांची राजकीय दिशा व धोरण ठरविण्याच्या करीता समस्त पाटील गटातील ज्येष्ठ विचारवंत व मुत्सद्दी मंडळींची विचार-विनिमयपर बैठक पार पडली.
या बैठकी प्रसंगी, मागील काही राजकीय घडामोडींवर व सद्य स्थितीवर प्रदीर्घ व विस्तृत मंथन घडले. बैठकीच्या वेळी येणाऱ्या काळात ‘प्रखर हिंदुत्व’ व हिंदू धर्म रक्षणासाठी पाटील गटाने आपले प्रामाणिक श्रम व योगदान द्यावे, असे ज्येष्ठांकडून सुचविण्यात आले. पाटील घराण्याचे हिंदू धर्म वृद्धी कार्य पाहता, हिंदू धर्म वृद्धीचे काम करत व हिंदुत्ववादी विचाराशी समरस असलेल्या राजकीय विचारधारेशी आपल्या पाटील गटाची मोठ बांधावी व आपण पुढील वाटचाल करावी असा सूर बैठकीतील मान्यवरांनी व्यक्त केला.
या बैठकीला ज्येष्ठ विधिज्ञ विश्वनाथ फताटे, राजकुमार हळ्ळी, वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ, विजयपूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सिद्धराम गौडा पाटील, राजकुमार गांधी, विजय पिसे, माजी नगरसेवक सुरेश तमशेट्टी, उद्योजक प्रभुराज मैंदर्गी, बसवराज बगले, बसवराज सावळगी, उद्योजक बसवराज करजगीकर, उद्योजक सिद्धेश्वर किणगी, राजकुमार बेळगी, दिलीप अवसेकर, अरुण लातुरे, मोहन चिंतालवार, अरविंद मानवी, चंद्रकांत वाकसे, प्रकाश परमशेट्टी, किरण कराळे, नागनाथ कुर्ले, दयानंद भोगडे, गिरीष अक्कलकोटे, देवेंद्र घाटगे, रमेश कोळी, विधीज्ञ विक्रांत फताटे, गिरीष किवडे, रोहन किणगी, रोहन पाटील, प्रशांत पाटील, संजय पाटील, दिपक काटकर, संजय स्वामी, दत्ता शिंदे, संगमेश्वर भैरप्पा, सोमनाथ गाढवे, सुधीर तमशेट्टी, भीमाशंकर करजगीकर, रविराज बेळगी, सतीष तमशेट्टी आदी उपस्थित होते.