□ बलात्कारी आरोपींना ठोकल्या बेड्या, गाफील पोलिसांच्या आवळल्या नाड्या
• सोलापूर/ विशेष प्रतिनिधी
बलात्कार पिडीत मुलीवर तिच्याच घरात घुसून तिच्यावरच बलात्कारी आरोपींनी केलेल्या खुनी हल्ल्याला ‘सुराज्य’ने वाचा फोडताच बार्शी पोलिसांना जबरदस्त तडाखा बसला असून आरोपींना तर बेड्या पडल्याच. ‘Surajya’ bust: Three police officers along with one policeman suspended in Barshi rape case शिवाय या प्रकरणात गाफील राहणाऱ्या पोलिसांच्याही नाड्या आवळल्या गेल्या आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बार्शी शहर आणि तालुका पोलीस ठाण्यातील मिळून एकूण तीन अधिकाऱ्यांसह एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. न्यायालयानेही आरोपींना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक सारिका गटकुळे, हवालदार भगवान माळी, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक महारुद्र परजणे, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र मंगरूळे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बारावीची परीक्षा देणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल असून त्याचा तपास महिला फौजदार सारिका गटकुळे यांच्याकडे होता.
याच प्रकरणातील आरोपींनी बलात्कार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पिडीत मुलीच्या घरात घुसून तिच्यावर सत्तूर व कोयत्याने वार केले होते. त्यात तिच्या उजव्या हाताची दोन बोटे तुटली आहेत. यासंदर्भातील गुन्हा बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दाखल असून त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्याकडे होता. या दोन्ही प्रकरणात दोन्ही पोलीस ठाण्यातील वरील चौघांना बुधवारी निलंबित करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी अक्षय विनायक माने (वय २३) आणि नामदेव सिध्देश्वर दळवी (वय २४, दोघेही रा. बळेवाडी, ता. बार्शी) यांना बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
बार्शी शहर पोलिसांकडील तपास संपल्यानंतर बार्शी तालुका पोलीस त्यांच्याकडील गुन्ह्यात या आरोपींना अटक करणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● बार्शी शहर पोलिसांना हलगर्जीपणा भोवला :
या प्रकरणातील पिडीत मुलीवर आरोपींनी बलात्कार केल्याची गुन्हा रविवारी (दि. ५ मार्च) रात्री बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मात्र पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली केल्या नव्हत्या. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या आरोपींनी दुसऱ्या दिवशी म्हणजे बलात्कारानंतर चोवीस तासांनी घरात घुसून पिडितेवर खुनी हल्ला केला. आरोपींना अटक करण्यासंदर्भात बार्शी शहर पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवल्यामुळेच महिला फौजदार गटकुळे आणि हवालदार माळी यांना निलंबित करण्यात आले.
● तपास पोलीस उपाधीक्षकांकडे
यासंदर्भातील गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब करणे, पिडितेला तात्काळ वैद्यकीय तपासणीला घेऊन न गेल्याचा ठपका ठेवून बलात्काराच्या गुन्ह्यातील तपासी अंमलदार आणि खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यातील तपासी अंमलदार यांना निलंबित करण्यात आले आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास बार्शी विभागाच्या पोलीस उपाधीक्षकांडे सोपवण्यात आला असल्याचे शिरीष सरदेशपांडे (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण) यांनी सांगितले.
● ‘सुराज्य’ने केला भांडाफोड :
पहिल्या दिवशी बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला असताना आणि आरोपी निष्पन्न झालेले असतानाही त्यांना अटक करण्याच्या हालचाली बार्शी शहर पोलिसांकडून करण्यात आल्या नाहीत. त्यामुळेच आरोपींनी दुसऱ्या दिवशी पिडितेवर घरात घुसून खुनी हल्ला केला.
पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच आरोपींना बेड्या ठोकल्या असत्या तर दुसरा गुन्हा घडलाच नसता. दुसरा गुन्हा घडण्यास पोलिसांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा भांडाफोड ‘सुराज्य’ने बुधवारच्या अंकात केला. त्याची दखल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी घेतली आणि चौघांना निलंबित केले.