● सोलापुरात जुन्या पेन्शनसाठी जेलमध्ये जाण्याचा इशारा
सोलापूर / मुंबई : जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरु असलेल्या बेमुदत संपाची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेतली गेलीय. एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे. मात्र आजपासून सुरु झालेल्या संपामुळे आरोग्यसेवेसह अनेक ठिकाणची प्रशासकीय कामे खोळंबली आहेत. याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होत आहे. Old Pension Yojana agitation noticed by Chief Minister; Primary teachers union withdraw from strike Solapur Pune Nashik Mumbai Sambhajinagar
जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी नवीन समिती स्थापन करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज विधानसभेत ही घोषणा केली. ही समिती 3 महिन्यात अहवाल सादर करेल, यानंतर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, संप मागे घ्यावा, असे ते म्हणाले. राज्यातील तब्बल 18 लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आज संपकरी संघटनांच्या काही सदस्यांशी चर्चा केली.
जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरु असलेल्या बेमुदत संपात फूट पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आम्ही संपातून बाहेर पडतोय, अशी घोषणा प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी केली. ‘संपातील सहभागी संघटनांपैकी सर्वात मोठी कर्मचारी संख्या आमच्या संघटनेची आहे, सरकार जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक आहे, त्यामुळे संप कशासाठी करायचा,’ असे थोरात यांनी म्हटले.
प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिष्टमंडळासोबतच्या बैठकीच्या पहिल्या फेरीची चर्चा संपल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आपापसात चर्चा केली. त्यानंतर आता दुसऱ्या फेरीची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला होता. त्यामुळे ही बैठक महत्वाची आहे.
सोलापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी कार्यालये ओस पडली आहेत. यातच ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील कर्मचारी संघटनांच्या एकीला ठाण्यातून मोठा हादरा बसल्याचे बोलले जात आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामध्ये जवळपास 18 लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्याचा परिणाम अनेक कार्यालयांमध्ये पाहायला मिळाला आहे. पुण्यातील ससूनसह काही रुग्णालयातील कर्मचारी संपावर आहेत. तर नाशिक, अहमदनगर, अकोल्यासह काही जिल्ह्यांत शिक्षकांनी मोर्चा काढला आहे. उद्या या संपाचा कामकाजावर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे ही आमची मागणी असून ती पूर्ण नाही झाल्यास आमची जेलमध्ये जाण्याची तयारी आहे पण ही पेन्शन घेतल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही, असा इशारा सोलापुरात सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी दिला.
आजपासून शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांनी जुनी पेन्शनसाठी बेमुदत संप पुकारला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (पूनम गेट)येथे सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन आपल्या न्याय मागण्यांसाठी आवाज उठवत जुनी पेन्शन देण्याची मागणी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांचे समर्थन करीत आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे जर ती मिळाली नाही तर आपणदेखील या कर्मचाऱ्यांसोबत जेलमध्ये जायला तयार असल्याचेही आडम मास्तर म्हणाले.
यावेळी निमंत्रक अशोक इंदापूरे यांनी, सरकारने कर्मचाऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. लवकरात लवकर सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. अन्यथा हा बेमुदत संप असाच सुरू ठेवू, असा इशारा दिला.
यावेळी पृथ्वीराज दिलीप माने, ‘आप’चे सागर पाटील, वंचित आघाडीच्या पल्लवी शिरसट तसेच
विरुपाक्ष घेरडे, अमृत कोकाटे,शंतनू गायकवाड, विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, सुधीर चंदनशिवे,बापू सदाफुले, शशिकांत शिरसट ,आशा कसबे,रूथ कलबंडी, ज्योतीराम शिंदे, बाली मंडेपू, समीर राऊळ,राम शिंदे ,विजय भांगे , राजू कैय्यावाले आदी विविध शासकीय व निमशासकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे,अशी एकमुखी मागणी केली.
या संपात अशोक जानराव, जनार्दन शिंदे, दिलावर मणियार, बाबासाहेब इंगळे, धनंजय माळवे, राजकुमार पांडेकर, जयंत जुगदार, दत्ता भोसले, प्रसाद सोनवणे, मनीष सुरवसे, सायमन गट्टू, संतोष दीक्षित,बसवेश्वर मोटे , सुरज देवदास, अरुण क्षीरसागर, गिरीश जाधव, देविदास शिंदे, शंकर जाधव, विशाल गावडे यांच्यासह सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
● संपकरी शिक्षकांना नोकरीवरून काढण्याची धमकी
सरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यभरात जुन्या पेन्शन योजनेसाठी संप सुरु आहे. यातच आता संपात सहभागी झालेल्या शिक्षकांना प्राचार्यांनी नोकरीवरुन काढण्याची धमकी दिल्याची घटना नागपुरात घडली आहे. तसेच नागपुरातील शासकीय कार्यालयातील कर्मचारी संपात सामील होणार असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पुन्हा नवे राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.