लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा-निलंगा रस्त्यावर उत्का पाटीवर कार उलटून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले असून तिघेजण जखमी झालेत. हा अपघात आज सोमवारी सकाळी सातच्या सुमारास झाला. Four from the same house killed in car accident Latur Akkalkot Vagdari Rath Yatra Stone Wheel Parameshwara Yatra
अपघातात मरण पावलेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. निलंगा येथील रहीवासी सचिन बडूरकर हे परिवारासह पुणे येथून निलंग्याकडे येत असताना त्यांची कार पलटी झाली. यात त्यांची दोन मुले, एक पुतण्या व मेव्हणा जागीच ठार झाला तर ते स्वतः त्यांची पत्नी व मुलगी जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल
करण्यात आलयं. कार रस्ता सोडून खड्ड्यात कोसळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील बडुरकर यांच्या नातेवाईकांच्या मुलाचा पुण्यात लग्न समारंभ होता. तो आटोपून बडुरकर कुटुंबीय निलंग्याकडे निघाले होते. औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ त्यांची कार येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि सुसाट वेगात असलेली कार पुलाखालच्या खड्ड्यात जाऊन कोसळली. त्यात बडुरकर कुटुंबातील चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला.
अंश किरण बडुरकर, जय सचिन बडुरकर, अमर सचिन बडुरकर आणि प्रकाश कांबळे अशी अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत. अपघातात जान्हवी सचिन बडुरकर, यश किरण बडुरकर, गोदावरी सचिन बडुरकर, सचिन दिगंबर बडुरकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 वागदरीतील ग्रामदैवत परमेश्वर यात्रेत थरार; रथाच्या दगडी चाकाखाली सापडून दोघे ठार
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त रविवारी ( ता.26) सायंकाळी रथोत्सवात मोठी दुर्घटना घडली. रथाचा लोखंडी रॉड (अक्सल) अचानकपणे तुटले. त्यामुळे पुढचे दगडी चाक निखळले. त्या निखळलेल्या चाकाखाली सापडून दोघा भाविकांचा मृत्यू झाला तर एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.
या दुर्दैवी प्रसंगामुळे गावावर शोककळा पसरली असून यात्रा थांबवण्यात आली. गंगाराम तिप्पण्णा मंजुळकर गाडीवडर (वय ६८) व ईरप्पा (संजय) गिरमल नंदे (वय ३४, दोघे रा. वागदरी) या दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तर उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे जखमी झाले.
निखळलेल्या दगडी चाकाखाली सापडल्यानंतर मंजूळकर व नंदे हे गंभीर जखमी झाले. त्याच अवस्थेत त्यांना उपचारासाठी अक्कलकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. रथोत्सवाप्रसंगी हजारो भक्तांची उपस्थिती होती. रथ मंदिराकडे जाऊन बसस्थानककडे येताना ही दुर्घटना घडल्याचे समजते. यावेळी रथ जागीच थांबवण्यात आला. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
रात्री उशिरापर्यंत उत्तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा उत्सव काळात रथोत्सव सुरू होता. या धार्मिक कार्यक्रमामध्ये रथाच्या पुढच्या चाकातील पहार अचानकपणे निसटली. मोठ्या प्रमाणात सीमावर्ती भागातून भाविक यात्रेकरिता जमले होते. यात्रेतील मुख्य कार्यक्रम रथ ओढणे हा असतो.
परमेश्वर मंदिर ते बसस्थानक भागापर्यंत असंख्य भाविक रथ ओढतात. सुमारे १२ फूट रुंद असलेल्या रथाला गोलाकार दगडी चाके आहेत. रथ ओढणे या धार्मिक विधीवेळी “परमेश्वर महाराज की जय’ च्या घोषणा दिल्या जातात व स्थावर भाविक खारीक व इतर प्रासादिक वस्तूंची उधळण करत असतात. जयजयकार करीत रथोत्सव पुढे जात असताना अचानकपणे ही दुर्दैवी घटना घडल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर वागदरी येथील परमेश्वर यात्रा उत्सवातील नाटक व कुस्ती सह सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.
मयत गंगाराम हे भाजीपाला व्यवसाय करून आपली उपजीविका करत होते. त्यांना दोन भाऊ, पत्नी, तीन मुली, दोन मुले आहेत. मयत ईरप्पा ऊर्फ संजय हे वागदरीतील सिध्दगंगा ढाब्यावर आचारी म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील व एक भाऊ, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या
पोलीस व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगितले.