○ बोरामणी विमानतळासाठी एकजुटीने प्रयत्न करणार
○ बोरामणी विमानतळ विकास व सिद्धेश्वर कारखाना बचाव समितीची भूमिका
सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यावर हजारो शेतकरी व कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह आहे. सोलापूर विकासासाठी या कारखान्याचा हातभार आहे. चिमणीही सोलापूरच्या विकासाचा एक भागच आहे. विमानसेवा सुरू करण्यासाठी 106 अडथळे दूर करावे लागणार आहेत. The ‘chimney’ of Sri Siddheshwar Sugar Factory is also a part of the development of Solapur. फक्त चिमणी पाडण्याचा आग्रह ही दिशाभूल आहे. होटगी रोडवरील विमान सेवा सुरू करणे तसेच बोरामणी विमानतळाचे काम मार्गी लावण्यासाठी एकजुटीने जनरेटा निर्माण करण्यात येणार आहे. तेव्हा चिमणीचे आडून शहरात सामाजिक वातावरण दूषित करू नये, अशी भूमिका बोरामणी विमानतळ विकास व सिद्धेश्वर कारखाना बचाव समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.
बोरामणी विमानतळ विकास व सिद्धेश्वर कारखाना बचाव समितीच्या वतीने ऍड. रा. गो. म्हेत्रस, डॉ. रावसाहेब पाटील, दिनेश शिंदे, अशोक बिराजदार, दत्ता थोरे आदींनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
ऍड. रा.गो म्हेत्रस म्हणाले, सोलापुरात उद्योग वाढीसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. विमान आले तर उद्योग येणार हा तर्क चुकीचा असून योग्य वाटत नाही. बोरामणी येथील विमानतळासाठीची संबंधित जागा ही वन विभागाची नसून ती गायरान जमीन आहे. या संदर्भात सक्षम पुरावा मिळाला आहे. यापुढे बोरामणी विमानतळासाठी एकजुटीने पाठपुरावा करण्यात येणार आहे. प्रसंगी रस्त्यावरही उतरण्यात येईल, असे स्पष्ट केले.
दत्ता थोरे यांनी यावेळी आक्रमक भूमिका मांडली. यापूर्वी विकास मंचने आंदोलन केले. शाळेतील मुले घेऊन हे आंदोलन केले असे आंदोलन करणाऱ्यांनी जन आंदोलनाची भाषा करू नये. फक्त कारखाना बंद करून विकास मंचला काय मिळणार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हीच शक्ती बोरामणी विमानतळासाठी वापरले असती तर अधिक बरे झाले असते. विकास मंच शहरात सामाजिक वातावरण दूषित करत आहे. असंतोष निर्माण करत आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत चिमणी पडू देणार नाही आहे, असे दत्ता थोरे यांनी सांगितले.
बोरामणी विमानतळाचे काम सुरू व्हावे यासाठी आमच्या समितीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जमावा जमा केली आहे. जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे. प्रसंगी जनजागृती करून जनरेटा उभारण्यात येईल, अशी भूमिका रावसाहेब पाटील यांनी यावेळी मांडली.
बोरामणी विमानतळासाठीच्या जमिनीतील काही जमीन ही वनविभागाची नव्हे तर गायरान आहे. त्यासाठी सर्व कागदपत्रे व पुरावे संकलित केले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यानंतर हे बोरामणी विमानतळ सुरू करावे. यासाठी सर्वांना घेऊन प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दिनेश शिंदे यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ सोलापूरच्या विकासासाठी सिद्धेश्वर कारखान्याचा हातभार
श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना हा 30 हजार शेतक-यांच्या मालकीचा असून 1 हजार पेक्षा अधिक कर्मचारी व कामगार, 15 हजार ऊस तोड मजूर आणि 1 हजार वाहतूकदारांचा उदरनिर्वाह या कारखान्यावर अवलंबून आहे. जी चिमणी पाडण्याचा ही तथाकथित मंडळी भाषा करतात. त्या चिमणीव्दारे मागील गळित हंगामात 12 कोटी 7 लाख युनिट इतकी वीज महावितरण कंपनीला निर्यात केली आहे. त्यामुळे ही चिमणी देखील सोलापूरच्या विकासाचा एक भाग आहे. श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक उलाढाल 500 कोटीपेक्षा अधिक असून सोलापूरच्या विकासासाठी कारखान्याचा हातभार आहे, असे अशोक बिराजदार यांनी सांगितले.
○ विमानसेवाही अत्यावश्यक परंतु…
बोरामणी विमानतळाचा विकास आणि साखर कारखान्याचा बचाव आणि होटगी रोडवरील विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने विमानसेवा ही अत्यावश्यक आहे. परंतु याचा अर्थ एखादा चालू असलेला उद्योग बंद पाडणे म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला खीळ घालण्याचे काम शहरात काही मंडळी करीत आहेत. शहराच्या विकासाचा मक्ता जणू काही तथाकथित विकास करणा-यांनीच घेतला आहे असे चित्र रंगवून सोलापूरकरांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप समितीने केला.
विमानसेवा सुरू होण्यासाठी आम्ही देखील सगळे आग्रही आहोत. यासाठी बोरामणी येथील विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून हेच विमानतळ पुढील अनेक वर्षांच्या विकासाचा विचार करता महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर श्री सिद्धेश्वर साखर कारखाना देखील चालला पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे.
गेल्या काही वर्षापासून कारखान्याच्या चिमणी विषयी अनेक गोष्टी न्यायप्रविष्ठ आहेत. परंतु प्रशासन आपल्या पातळीवर काही निर्णय घेत आहे. या निर्णयाच्या बाबतीत प्रशासनाला सूचना देण्याचा आणि कारखान्याला आदेश देण्याचा अधिकार या तथाकथित विकास करू इच्छिणाऱ्यांना आहे का ? आणि अशी वक्तव्य आपण कोणत्या अधिकारात करतो, याचा विचार देखील यांनी करणे गरजेचे आहे.
चिमणी विषयी मनपा आयुक्तांनी 45 दिवसांची मुदत कारखान्यास दिली आहे. या दरम्यान सनदशीर मार्गाने कारखाना प्रशासन आणि मनपा योग्य ते निर्णय घेतील. परंतु 45 दिवसाच्या आत चिमणी पाडली नाही तर जनआंदोलन करू, असे चितावणीखोर वक्तव्य करणाऱ्या या तथाकथित मंडळींना शहरात सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून वातावरण बिघडवण्याचे अधिकार कोणी दिले ? या तथाकथित विकास करू पाहणाऱ्यांची भूमिका दुटप्पी असून कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांना या संघटनेतील श्री मिलिंद भोसले योगेश गुजर व उद्योजक पैनगोंडा यांच्यासह चौघा – पाच जणांनी एकत्र येऊन भेट घेतली असून चिमणी आणि कारखाना यास आमचा विरोध नाही फक्त विमान सेवा सुरू व्हावी एवढीच आमची इच्छा आहे. आम्ही आपल्या सोबत आहोत. होटगी विमानतळावरून एकाच बाजूने विमानसेवा सुरू करण्यासाठी आपण मिळून प्रयत्न करू असे दोन वेळा बैठक घेऊन सांगितले आणि आता पुन्हा चिमणी पाडण्याची बोलत आहेत. या कारखान्याकडे आणि या चिमणीकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा कोणीही विचार करु नये.
○ शहराच्या विकासाच्या नावाखाली कुणाची सुपारी घेतली आहे का ?
एअरपोर्ट अॅथॉरिटीच्या पूनर सर्व्हेनुसार विमानसेवा सुरू करणेसाठी 106 अडथळे दूर करावे लागणार आहेत. फक्त चिमणी पाडण्याच आग्रह तथाकथित मंडळी का करत आहेत. याचा अर्थ त्यांना नेमका विकास करायचा आहे का ? श्री सिध्देश्वर साखर कारखाना बंद पाडायचा आहे. शहराच्या विकासाच्या नावाखाली कुणाची सुपारी घेतली आहे का? असा संशय अनेकांना पडला आहे.
आमची कृती समिती बोरामणी विमानतळाचा विकास कारखान्याचा बचाव आणि बोरामणी विमानतळ सूरू होईपर्यंत होटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही समितीने स्पष्ट केले.