● हा आत्मस्तुती कार्यक्रम नाईलाजाने व जबरदस्तीने ऐकावे लागतंय
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांचे प्रेम मन कि बातवर आहे, संविधानावर नाही, असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ‘देशाने प्रथमच रडणारा पंतप्रधान पाहीला आहे. संविधानावर त्यांचं प्रेम असतं तर शिव्यांची यादी वाचण्याची वेळ पंतप्रधानांवर आली नसती. लोक शिव्या देतात म्हणून ते रडले. आजपर्यंतच्या सगळ्या पंतप्रधानांवर टीका झाली आहे. पण ते रडले नाही’, असे राऊत म्हणाले. PM Modi’s love for mind ki baat, not constitution, ‘He misleads people by saying mind ki baat’ Sanjay Raut
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींच्या मन कि बातवर टीका केली. ‘लोकशाही मान्य नसेल ते मन कि बातच बोलतात. त्याचा प्रत्यय प्रधानमंत्री मोदींच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लोकशाहीमध्ये जनतेच्या मनातलं ऐकून जनतेसाठी काम केलं पाहिजे. मन कि बात सांगून लोकांना भूलथापा दिल्या जात आहेत. मन कि बात ऐकण्यासाठी लोकांकडे वेळ नाही. मन कि बातमधून जनतेला शुन्य मिळालं’, असे पटोले म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्र अस्थिर आहे, याला दिल्लीचे लोक जबाबदार आहेत. आपल्या देशात संविधान वाचवण्याची नितांत गरज आहे. संविधानाचे निर्माते या महाराष्ट्राचे आहेत आणि महाराष्ट्रातच संविधानाची सर्वाधिक पायमल्ली सुरु आहे. कायद्याचं राज्य मोडून काढलं जातं आहे. देशभरात ज्या अनेक गोष्टी घटनेच्या आधाराने निर्माण केल्या त्याची पायमल्ली केली जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अस्थिर होण्यास दिल्लीचे आणि महाराष्ट्रातील काही लोक जबाबदार आहे. ”
“देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना संविधानावर अजिबात प्रेम नाही. संविधानापेक्षा पंतप्रधानांचं मन की बातवर जास्त प्रेम आहे. जर संविधानावर प्रेम असतं तर पंतप्रधानांवर मला लोक शिव्या देतात असं सांगत 91 शिव्यांची यादी वाचून दाखवण्याची वेळ पंतप्रधान मोदींवर आली आहे. लाल बहाद्दूर शास्त्री, पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी या सगळ्यांना शिव्या दिल्या गेल्या. मात्र त्यांनी कुणीही त्याचा वापर मतं मिळवण्यासाठी केला नाही. आपले पंतप्रधान प्रचारसभेत शिव्या वाचून दाखवत आहे. देशाने पहिल्यांदा रडणारा पंतप्रधान पाहिला आहे,” असा टोलाही यावेळी राऊतांनी मोदींना लगावला.
मनकी बातचे १०० भाग पूर्ण केले पण पंतप्रधान मोदींनी देशातील ज्वलंत मुद्द्यांचा एकाही भागात उल्लेख केला नाही. महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची दादागिरी, महिला कुस्तीपटूंवर भाजपा खासदाराने केलेले लैंगिक अत्याचार, कर्नाटकातील ४०% भ्रष्ट सरकार, बँक लुटेरे, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर ‘मन की बात’ करावी वाटत नाही. लोकशाहीमध्ये ‘मन की बात’ नाही तर ‘जनता की बात’ करावी लागते, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
देशातील जनता महागाईत होरपळून निघत आहे, अर्थव्यवस्था रसातळाला पोहचली आहे. सीमेवर चीनच्या भारतविरोधी कारवाया वाढलेल्या आहेत पण मोदी चीनचा साधा उल्लेखही करण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत. नरेंद्र मोदींचे मित्र सामान्य लोकांचे बँकांतील कोट्यवधी रुपये घेऊन देशाबाहेर पळून गेले पण त्यावर मौन बाळगून असतात. कर्नाटकात ४० टक्के कमीशनचे सरकार आहे. मुख्यमंत्रीपदाचा लिलाव लागतो पण त्यावर मोदी ‘मौनी बाबा’सारखे गप्प आहेत. फक्त काँग्रेसला शिव्या देणे व स्वतःची स्तुती करणे यापलीकडे मोदींची ‘मन की बात’ पुढे सरकतच नाही. भाजपाच्या देशभरातील मंत्री, संत्री, पदाधिकारी यांना मात्र मोदींचा या आत्मस्तुती कार्यक्रम नाईलाजाने व जबरदस्तीने ऐकवा लागत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 अमित शहांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसोबत पाऊण तास चर्चा
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी शाह यांनी आमदार पराग अळवणी यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी तब्बल पाऊण तास त्यांच्याशी चर्चा केली आहे. ही चर्चा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर झाल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झालं आहे. गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबईत दाखल झाले आहेत. ते दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. महिन्याभरातील त्यांचा हा दुसरा दौरा आहे. विलेपार्लेतील ‘मन की बात’ कार्यक्रम लाईव्ह प्रसारित केला जाणार असून याच कार्यक्रमाला अमित शाह हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा 100 वा ‘मन की बात’ कार्यक्रम आहे. कार्यक्रमानंतर ते पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातील दौरे वाढल्याचे दिसून येत आहे. अमित शहा आज पुन्हा मुंबई दौऱ्यावर आले आहेत.
त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत जवळपास पाऊण तास चर्चा केल्याची माहीती आहे. आमदार पराग अळवणी यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी ही चर्चा झाल्याचे समजते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. याचा वृत्तात काही वृत्तवाहिन्यांवर दाखवला जात आहे.
चर्चेत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांची भेट देखील घेतली आहे. यावेळी अमित शाह आणि त्यांच्यामध्ये आमदार पराग अळवणी यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशावर झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.