सोलापूर / पंढरपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पंढरपुरात अभिजीत पाटलांचा राष्ट्रवादी प्रवेश करून घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा, आमच्या सहकाऱ्यांचा, महाविकास आघाडीचा लोकप्रिय उमेदवार कोण आहे, असा प्रश्न विचारला तर अभिजीत पाटील यांचे नाव निश्चित समोर येईल, असे स्पष्ट संकेत आज मिळाले आहेत. Abhijit Patal’s entry into Pandharpur as a nationalist, Sharad Pawar praised Solapur politics
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे, रवींद्र धंगेकर, कैलास पाटील, संजय शिंदे, यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, बळीराम साठे, उमेश पाटील आदी उपस्थित होते.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना तुम्ही संपूर्ण ताकदीने उभं करा. मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्यावेळी निवडणूक येईल, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा, आमच्या सहकाऱ्यांचा, महाविकास आघाडीचा लोकप्रिय उमेदवार कोण आहे, असा प्रश्न विचारला, तर लोक अभिजितचं नाव घेतील, यासंबंधीची तयारी तुम्ही सुरू करा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूर – मंगळवेढ्यातून पाटील यांच्या उमदेवारीचे स्पष्ट संकेत दिले.
शरद पवार म्हणाले की, तुम्ही आज अभिजीत पाटील यांना साथ दिली. तुम्ही लोकांनी अभिजित पाटील यांच्यासारखं नेतृत्व तयार केले आहे. या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याची आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे. नुसतं पाठीशी उभा राहायचं नाही, तर औदुंबरअण्णा पाटील, भारत भालके यांच्यानंतर पंढरपूर तालुका पोरका वाटतो. त्याचे हे पोरकेपण घालवण्याची ताकद आज अभिजित पाटील यांच्यामध्ये आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांना तुम्ही पूर्ण ताकदीने उभं करा.
एकेकाळी हा सोलापूर जिल्हा दुष्काळी होता. पण, (स्व.) यशवंतराव चव्हाण यांनी उजनी धरणाचा पाया घातला आणि त्यातील पाण्याच्या जोरावर आज जिल्ह्यातील उसाची शेती फुलेली आहे. पहिल्या पिढीने मोठे काम केले आहे. त्यानंतर बबनदादा, राजन पाटील यांच्यासारखी दुसरी पिढीही जिल्ह्यात कार्यरत आहे. आता तिसऱ्या पिढीनेही पुढे येऊन शेती क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन काम केले पाहिजेत, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, औदुंबरअण्णा पाटील यांनी नवे साखर कारखाने उभे केले. पण, अभिजित पाटील यांनी बंद पडलेले, मोडकळीस आलेले साखर कारखाने सुरू करण्याची नेतृत्वशैली विकसित केली आहे. हे कारखाने ते नुसते चालूच करत नाहीत, तर गिऱ्हाईकाला परवडेल अशा पद्धतीने चालवत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, बार्शी, पंढरपूर, माळशिरस, सोलापूर शहर आदी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. पण 2014 नंतर ते वर्चस्व घटले. मोहिते पाटील, शिंदे, परिचारक, भालके ही राजकीय कुटुंबे राष्ट्रवादी पासून दूर गेली आणि संघटनात्मक पातळीवर राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होऊन 2014 आणि 2019 मध्ये भाजपने सोलापूर जिल्ह्यात प्रभावी नेटवर्क उभारले.
आता त्या नेटवर्कलाच धक्का देण्याची तयारी करून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची डागडुजी आरंभली आहे. पण यामध्ये भाजपला धक्का देण्यापेक्षा आपल्याच पक्षाची फेरबांधणी आणि ती देखील अजित पवारांना नव्हे, तर सुप्रिया सुळे यांना अनुकूल करून घेण्यासाठी पवार धडपडत आहेत. यासाठी त्यांनी आमदार रोहित पवारांना आपल्या दौऱ्यात बरोबर घेतले आहे आणि यातला पहिला पक्षप्रवेश अभिजीत पवारांच्या रूपाने विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर करून घेतला आहे.
अजित पवारांनी गेल्या 20 वर्षात महाराष्ट्रातल्या स्थानिक पातळीवर आपापले समर्थक उभे केल्याने त्यांनाही शह देण्याची गरज पवारांना वाटत आहे. कारण त्यांना शिवाय सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत उभे राहू शकत नाही, ही राजकीय वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच पवारांनी सोलापूर जिल्ह्यासाठी दोन दिवस दिले आहेत आणि त्या सर्व कालावधीत ते सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये जुन्या आणि विशेषतः नव्या कार्यकर्त्यांना भेटून राष्ट्रवादी काँग्रेसची नवी संघटनात्मक बांधणी करणार आहेत. अभिजीत पाटलांच्या पक्षप्रवेशाने त्याची सुरुवात केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● कारखाना १२ वर्षांनंतर चालू झाला, शरद पवारांनी आठवण करून दिली
एकेदिवशी अभिजित पाटील माझ्याकडे येऊन ‘सांगोल्याचा सहकारी साखर कारखाना चालवला घेत आहे, असे सांगितले. मी म्हटलं, ‘अभिजितराव, काय झालंय काय तुम्हाला. त्या कारखान्यात काय आहे का शिल्लक. पहिला कारखाना जाऊन पहा, असे मी सांगितले. त्यांनी जाऊन पाहिलं, दीपक साळुंखे यांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मला येऊन सांगितलं की, सगळं जागेवर आहे.
धाडसाने, कष्टाने आणि काटकसरीने कारखाना चालवायचा निकाल घेतला, तर कारखाना चालू शकतो. मी म्हटलं तुम्हाला खात्री आहे का, त्यांनी सांगितलं, हो मला खात्री आहे. मी म्हटलं, गो अहेड, काय व्हायचे असेल तर पाहू. आज तो कारखाना १२ वर्षांनंतर चालू झाला आहे, अशी आठवण शरद पवार यांनी या वेळी सांगितली.