● राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्यासाठी अनेकजण उत्सुक
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या पेच प्रसंगानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सोलापूर दौऱ्यावर येऊन कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. Sharad Pawar tested, again Solapur Tour ‘Fix’ Nationalist watch is curious
आगामी लोकसभा विधानसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे बळ कामी येणार असल्याने खासदार शरद पवारांनी सोलापूरच्या नेते मंडळींचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लवकर घेण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्यासाठी अनेक जण रांगेत उभे आहेत. लवकरच हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून पुन्हा एकदा शरद पवार यांचा पुन्हा सोलापूर दौऱ्यावर फिक्स असल्याचे राष्ट्रवादी मधील काही पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाटेवर कोण कोण आहेत ? याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू झाली आहे.
राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी होती. महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी तसेच काँग्रेस मधील अनेक नेते मंडळींनी
हाताला बाय-बाय करत मनगटी घड्याळ बांधले तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत एमआयएमच्या तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे हे जरी राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित असले तरी त्यांचा अद्याप राष्ट्रवादीमध्ये अधिकृत प्रवेश झाला नाही. त्यामुळे महेश कोठे नेमके कोणत्या पक्षाचे असे उपरोधिकपणे बोलले जाते. मध्यंतरी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे काही खास विश्वासू सहकारी शिंदे गटात देखील सामील झाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आता महाविकास आघाडीचे सरकार जावून राज्यामध्ये शिंदे फडणीस यांचे सरकार आले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने आपली वज्रमूठ भक्कम केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये स्थानिक पातळीवर मतभेद असले तरी ही महाविकास आघाडी भक्कम असल्याचे वरिष्ठ पतळीवरील नेते मंडळी सांगतात. त्यामुळे स्थानिक नेते मंडळींचे सूर आता जुळू लागले आहेत. सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्याच अनुषंगाने रविवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सोलापूर दौरा झाला.
रात्री उशिरा त्यांचे शहरात आगमन झाले. त्यांच्या स्वागताला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिका-यांमध्ये एक नव चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यांनी भर पावसात राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्याला उपस्थित दाखवली.
यावेळी कार्यकर्त्यांच्या गर्दीत पवारांनी लोकांमध्ये जावून त्यांच्याशी केलेली हितगुज पाहता सोलापूर शहरांमध्ये राष्ट्रवादीला चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात. त्यानंतर सकाळी पंचतारांकित हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांशी पवारांनी संवाद साधला. त्यानंतर सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील राष्ट्रवादीचे माजी गटनेते किसन जाधव आणि प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यासोबत त्यांनी हॉटेल ते विमानतळ असा प्रवास केला. यावेळी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी गाडीचे सारथ्य केले. यावेळी झालेल्या हितगुज मध्ये मी पुन्हा येईन लवकर दौरा सांगेन. यावेळी रखडलेले सर्व राष्ट्रवादी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.
त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये कोण कोण प्रवेश करणार याची चर्चा आता रंगू लागली आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्वावर नाराज झालेला मोठा गट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा आहेत. त्यात शरद पवारांनी केलेलं हे वक्तव्य बरेच काही सांगून जाते. त्यामुळे भविष्यकाळात कोण कोण राष्ट्रवादी प्रवेश करतो हे पाहावे लागणार आहे. मात्र शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येते.