● भाकरी फिरलीच, उलथापालथही झाली
सोलापूर / शंकर जाधव
रविवार ७ मे हा दिवस सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकारणात तशी खळबळ उडवून देणारा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपापल्या परीने जिल्ह्याच्या राजकारणात ‘पुड्या’ सोडून दोन्ही पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. यामध्ये काहीजण हिरमुसले तर काहीजण खुशीच्या तोऱ्यात वावरले. Pandhari politics will heat up: Pandharpur politician Sharad Pawar will be a key issue in Solapur Lok Sabha
सोलापूर जिल्ह्यात अलिकडे सध्या वादळी वारे आणि पावसाचे थैमान सुरू आहे. त्यातच राजकारण्यांनी राजकीय वारे सोडून त्यात भर घातली आहे. सर्वच पक्षातील राजकीय गटबाजी, उलथापालथ, कोलांटउडी यामुळे सोलापूर जिल्हा तसा पोखरलेला आहे. याचाच फायदा राजकीय पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी घेताना दिसून येत आहेत. अलिकडील काळात राज्यात जसे सुरु आहे, अगदी तसेच राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांच्या आरोप
– प्रत्यारोपाच्या फैरी सोलापुरातही झडत आहेत.
यात विकासकामांच्या नावाने बोंबच आहे. खासदार शरद पवार हे राजकारणातील बडे प्रस्थ. पक्षाध्यक्षपदाच्या राजीनामा नाट्यानंतर बारामतीनंतरचा त्यांचा दुसरा सोलापूर दौरा स्व. आ. भारतनाना भालके यांच्या निधनानंतर साखरसम्राट अभिजीत पाटील यांच्या ताब्यात श्री विठ्ठल साखर कारखाना गेला. यामुळे सहकार आणि राजकीय क्षेत्रात अभिजीत पाटील यांचे प्रस्थ वाढले. त्यामुळे पाटील यांना ‘मला आमदार व्हायचंय’, अशी स्वप्ने जशी पडू लागली तसे पंढरपूरची जनताही त्यांच्याकडे त्याच नजरेने पाहू लागली.
पाच साखर कारखाने स्वत:च्या हिंमतीवर चालवणारा माणूस आहे तरी कोण?, हे शरद पवारांना पहायचे होते, म्हणून की काय, त्यांनी कारखान्याच्या कार्यक्रमाला आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. लागलीच त्यांनी अभिजीत पाटील यांच्यातील ‘चमक’ पाहून त्यांच्या हाती राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ बांधले. एवढेच नाही तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची घोषणाही केला. यावरुन शरद पवारांनी पढरपुरात तव्यावर भाकरी अशी फिरवली की, त्यांचे चटके त्यांना तर बसणार नाहीच, पण पंढरपुरातील राष्ट्रवादीतील अनेक स्थानिक नेत्यांना त्यांनी दिलेले ‘झटके’ विसरता येणार नाहीत.
अभिजीत पाटील यांचे तसे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगली जवळिकता. त्यांना अनेकजण ओढण्याच्या तयारीत असतानाच राष्ट्रवादीने त्यांना फासे फेकले आणि ते त्यांच्या गळाला लागले. यामुळे पंढरपूरच्या राष्ट्रवादीच्या राजकारणाला लगेच रविवारी वेगळे वळण मिळाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अभिजीत पाटील यांच्या कार्यक्रमाला भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे, याची अनुपस्थितीत सर्वांना खटकणारी ठरली. पण याहूनही अधिक पंढरीत रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी भालके यांनी घेतलेली भेट जास्त खटकणारी ठरली आहे. पटोले- भालके यांनी बंदखोलीत १५ मिनिटे चर्चा केली आणि, ‘आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही’, असे वचनही दिले. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसला धोक्याची घंटा मानली जात आहे. अभिजीत पाटील यांना घड्याळ बांधून नेमके शरद पवारांनी काय साधले आहे आणि त्यांचा मनात काय आहे, हे सांगणे तसे अवघड आहे. पण राष्ट्रवादीने तयारीत असलेले दोन मोहरे मात्र गमावले आहेत, हे मात्र निश्चित.
● सोलापुरातही भाकरी फिरवलीच….
खा. शरद पवार यांनी पंढरपुरात जशी भाकरी फिरवली तसी सोलापुरात फिरवून अनेकांना धक्के दिले आहे. एका विवाहसोहळ्याच्या निमित्ताने रात्री उशिरा पवारांचे सोलापुरात आगमन झाले. साताऱ्यात भर पावसात पवारांनी भाषण करुन संबंध महाराष्ट्राची त्यावेळी सहानुभूती मिळवली होती. आता सोलापुरात एका शुभकार्याच्या निमित्ताने ते आले आणि पावसात थोडे भिजले. यामुळे शरद पवारांना पाऊस लकी ठरतोय की काय, अशी चर्चा आहे. सोलापुरात काही मोजक्या पदाधिकारी व नगरसेवकांशी त्यांनी मुक्कामी असलेल्या एका हॉटेलवर जुजबी चर्चा केली. त्यानंतर मात्र त्यांनी माजी महापौर महेश कोठे, अॅड. यु. एन. बेरिया आणि सुधीर खरटमल यांच्याशी चर्चा केली.
या तिघांनी सोलापूर लोकसभा राष्ट्रवादी घेण्याची मागणी रेटून धरली, हे विशेष. पण सोलापूर शहर आणि जिल्हा पदाधिकारी बदलाचे संकेत देऊन येथे भाकरी फिरवण्याची गरज असल्याचे पवारांनी सांगितले. आता ते फिरवणाऱ्या भाकरीची ‘चव’ कुणाला चाखता येणार आहे, हे पहावे लागणार आहे. यात सुधीर खरटमल मात्र शहराध्यक्षपदासाठी टपून बसले असल्याचे दिसते आहे. पाहू आगे… आगे… होता है क्या ?.
○ नव्यामध्ये खुषी, जुन्यांमध्ये नाराजी
बेरिया – कोठे खरटमल ही जुनी काँग्रेसची व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची खास माणसे. काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या या जुन्या नेत्यांशी शरद पवार यांनी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचा कुठला पदाधिकारी वा स्थानिक नेता उपस्थित नव्हता, हे विशेष. यामुळे नव्यांमध्ये खुषी तर जुन्यांमध्ये नाराजीचा भावना दिसून आली.
○ पुन्हा एकदा लोकसभा…!
मध्यंतरी आ. रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा राष्ट्रवादीकडे घेण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर आ. प्रणिती शिंदे यांनी त्यांना तशास तसे उत्तर दिले होते. त्यावर पडदा पडला, हा भाग वेगळा, पण आता पुन्हा सोलापूर लोकसभेचा मुद्दा राष्ट्रवादीकडून पुन्हा उकरुन काढला जात आहे. यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये ‘कळी’ चा मुद्दा ठरणार, एवढे मात्र निश्चित.