अक्कलकोट/ रविकांत धनशेट्टी :
अक्कलकोट विधानसभेच्या निवडणुकीनंतर तालुक्यात मोठ्या निवडणुका झाल्या नव्हत्या. नुकत्याच झालेल्या अक्कलकोट आणि दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आ. सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला. त्यामुळे भाजपाला अच्छे दिन आल्याने कार्यकर्त्यात उत्साह आहे तर काँग्रेस कार्यकर्त्यात पराभवामुळे मरगळ दिसून येत आहे. ही मरगळ दूर करण्याचे आव्हान माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासमोर राहणार आहे. In Akkalkot BJP got a good day while Congress got Margal Siddharam Mhetre Sachin Kalyanshetty former minister MLA
अक्कलकोट तालुका पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण तो आता हळूहळू ढासळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुळात केंद्रात आणि राज्यात वरिष्ठ पातळीवर काँग्रेसमध्ये ताकदवान नेत्यांची वाणवा असल्यामुळे खालीपर्यंत त्याची झळ पोहचत आहे. एकेकाळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या ताब्यात आमदारकी तसेच मंत्रिपद होते. त्यावेळी काँग्रेसचा खूप मोठा दरारा हा जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये होता.
त्यांचे सरकार असेपर्यंत तो टिकून होता. मात्र जसे जसे केंद्रातील वातावरण बदलत गेले तसतसे राज्यातील व जिल्ह्यातील समीकरणे बदलत गेली. तरीही म्हेत्रे यांनी मोदी लाटेमध्ये २०१४ च्या निवडणुकीत विजय साकारून काँग्रेसला अच्छे दिन आणले होते.. याचे कौतुक काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात झाले होते. २०१९ ला मात्र हा वारू आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी रोखला.
२०१९ च्या पराभवामुळे गावोगावी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ आलेली आहे. कट्टर कार्यकर्त्यांची वाणवा दिसत आहे. आगामी काळात कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकून नव्या जोमाने काम करावे लागेल तरच यश मिळणार आहे. म्हेत्रे हे काँग्रेसचे निष्ठावान नेते आहेत. त्यामुळे भविष्यकाळाच्या दृष्टीने त्यांना उभारीसाठी मोठ्या नेत्यांच्या पाठबळाची गरज आहे. याउलट भाजपमध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिन कल्याणशेट्टी हे विश्वासू आमदार असल्याने याचा पुरेपूर फायदा आमदार सचिन कल्याणशेट्टीना होत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जिल्हाध्यक्षपद देऊन भाजपच्या जिल्ह्याचा कारभारच त्यांच्याकडे दिला आहे. नुकत्याच झालेल्या दोन्ही बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव करून कल्याणशेट्टींनी आपली राजकीय क्रेझ कायम ठेवली आहे. आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिका हस्तगत करण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे टोकाचे प्रयत्न करणार, हे बाजार समिती निवडणुकीदरम्यान झालेल्या संघर्षावरून दिसून येते.
दुधनी व अक्कलकोट या दोनही नगर पालिकेच्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे तर ग्रामीण भागात अजूनही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. आता हा वर्ग नेस्तनाबूत करून भाजप तळागाळात पोहोचवण्याचा मानस आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा आहे. एकूणच काय तर या पुढच्या निवडणुका एकमेकांच्या राजकारणाच्या मुळावर उठणार आहेत आणि प्रत्येक नेत्यांच्या राजकारणासाठी ‘करो या मरो’ची स्थिती राहणार आहे.
अक्कलकोट आणि दुधनी बाजार समितीतील पराभवानंतर आता आगामी निवडणुका काँग्रेस पक्षासह मित्र पक्षांसाठी आव्हानात्मक बनल्या आहेत.
या उलट भाजपने या दोन्ही बाजार समित्या जिंकून त्यांची ताकद वाढविली असून त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आगामी निवडणुका जिंकण्याची तयारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी चालवली आहे. भाजपची चाललेली घोडदौड रोखून २०२४ ची विधानसभा जिंकण्याचे खूप मोठे आव्हान आता काँग्रेससमोर म्हणजेच म्हेत्रे यांच्यासमोर राहणार आहे. ते आव्हान आता कशापद्धतीने पेलतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
● कल्याणशेट्टींना सिद्रामप्पांची साथ
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे अतिशय मुरब्बी नेते म्हणून जिल्ह्यात परिचित आहेत. ते आमदार कल्याणशेट्टी यांच्या बाजूने आहेत, ही त्यांची मोठी जमेची बाब आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांची महत्त्वाची भूमिका ठरली आहे. स्वामी समर्थ साखर कारखाना आणि दोन बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
● वरिष्ठ पातळीवरून म्हेत्रेंना बळ देण्याची गरज
राज्य पातळीवर काँग्रेसची सुरू असलेली फरपट ही खालीपर्यंत पोहोचली असल्याने आता उभारी कशी मिळणार याची चर्चा गावा – गावातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आता म्हेत्रे सारख्या नेत्यांना सर्व दृष्टीने बळ देण्याची गरज आहे. तरच काँग्रेस टिकणार आहे, असे कार्यकर्त्यातून सांगितले जात आहे.