● बाजार समितीमध्ये दिसणार टशन
सोलापूर / अजित उंब्रजकर : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदरच सोलापूर बाजार समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. All three MLAs of BJP will come together; Dilip Mane and Suresh Hasapure will fight with one accord for Bazar Samiti Tashan सोलापूर शहर उत्तर, दक्षिण, अक्कलकोट आणि मोहोळ या चारही विधानसभा मतदारसंघात बाजार समितीच्या निवडणुकीचा परिणाम होतो असे आजपर्यंतचे चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाजार समितीच्या या निवडणुकीत भाजपचे तिन्ही आमदार म्हणजे विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी एकत्र येतात का आणि दुसरीकडे माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे हे सहकारातील नेते यंदा तरी एक दिलाने निवडणूक अडवतात का आणि यांच्यात कोणत्या वाटाघाटी होतात याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे यंदा बाजार समितीत जाण्यासाठी सर्वांमध्ये जोरदार टशन दिसणार हे नक्की.
पुढील महिन्यात बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक संपणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया जवळपास सुरू करण्यात आली आहे. गत निवडणुकीत तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याविरुद्ध दिलीप माने यांनी सर्वपक्षीय मोट बांधली होती. माने- देशमुख यांच्या या लढाईत माने गटाने बाजी मारली होती. विशेष म्हणजे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख हे माने गटात सहभागी झाले होते. सुरुवातीला दिलीप माने हे बाजार समितीचे सभापती झाले मात्र त्यानंतर विजयकुमार देशमुख सभापती झाले आणि ते आजपर्यंत आहेत. त्यामुळे विजयकुमार देशमुख यांना आपल्या गटात सामावून घेणे हे माने यांना महागात पडल्याचे दिसून आले.
आता पुन्हा एकदा बाजार समितीची निवडणूक तोंडावर आली आहे. आमदार सुभाष देशमुख पुन्हा एकदा निवडणूक जिंकून मागचा पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सज्ज झाले आहेत यंदा त्यांना जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याशेट्टी यांची साथ मिळणार आहे. दुधनी आणि अक्कलकोट बाजार समितीवर आमदार कल्याणशेट्टी यांनी दणदणीत विजय मिळवला होता. सोलापूर बाजार समितीमध्ये अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील अनेक सोसायटी आणि गावांचा समावेश असल्यामुळे सचिन कल्याणशेट्टी यंदा सोलापूर बाजार समितीमध्ये ही लक्ष देणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांनी एकीचा नारा दिला होता. त्यामुळे यंदा आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासोबत आमदार विजयकुमार देशमुख हे तिन्ही आमदार एकत्र येऊन बाजार समिती निवडणूक लढवणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे दिलीप माने आणि सुरेश हासापुरे हे एकमेकांसोबत कसे जुळवून घेणार हेही पाहणे मजेशीर ठरणार आहे. मागच्या वेळेस दिलीप माने गटाच्या दोन जागा वगळता सर्व जागा निवडून आल्या होत्या. यापैकी एका जागेवर सुरेश हसापुरे यांचा पराभव झाला होता. हा पराभव जाणीवपूर्वक झाल्याची चर्चा सर्वत्र आजही होत आहे. त्यामुळे यंदा सुरेश हसापुरे हे सावध पावले टाकत असताना दिसत आहेत.
सद्यस्थितीत उत्तर आणि दक्षिण मधील सोसायट्यांचा विचार करता दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांचे जवळपास 114 सोसायट्यांवर वर्चस्व आहे. त्यामुळे या दोघांनी एकत्रित या निवडणूक मनापासून लढवली तर विजय सोपा जाईल असे सध्यातरी बोलले जात आहे.
दुसरीकडे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिलीप माने यांच्यासह सर्वपक्षीय मोट बांधली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र गत विधानसभा निवडणुकीत दिलीप माने यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, दिलीप माने यांच्या बाबतीत काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरेश हसापुरे हे सुशीलकुमार शिंदे यांच्या जवळचे मानले जात आहेत. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे बाजार समितीच्या निवडणुकीबाबत हसापुरे यांचा सल्ला घेणार असे चर्चिले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीत दिलीप माने यांच्या सोबत सुरेश हसापुरे यांची ही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
● माने यांना आ. देशमुख डोईजड
गत निवडणुकीत विजयकुमार देशमुख हे माने गटाकडून लढले होते. मात्र एकही सोसायटी नाही एकही पंचायत समिती नाही तरी आ. देशमुख हे डोईजड झाल्याचे आमदार दिलीप माने यांना पटले आहे. त्यामुळे आमदार दिलीप माने आता विजयकुमार देशमुख यांच्यासोबत काय भूमिका घेतात हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
● सुरेश हसापुरे यांची सावध चाल
दक्षिण तालुक्यातील 84 पैकी जवळपास 60 सोसायट्यांवर सुरेश हसापुरे यांचे वर्चस्व आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी हसापुरे यांनी सर्व सोसायट्यांच्या संचालकांचा सत्कार टाकळीकर मंगल कार्यालय येथे केला होता. यावेळेस त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शनही केले होते. त्यामुळे जनता आपल्यासोबत असते मात्र नेते गंमत करतात हे आता हसापुरे यांनाही उमगले आहे. त्यामुळे हसापुरे आता सावध आणि चतुराईने पावले टाकत आहेत.