पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना भेटण्यासाठी पुण्यातून विशेष विमानाने हैदराबाद येथे राव रवाना झाले आहेत. भालके हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. Bhagirath Bhalke of Pandharpur left to meet KCR; Sharad Pawar’s reaction is political
गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गेल्या काही दिवसांपूर्वी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. यानंतर भगीरथ भालके हे नाराज असल्याची चर्चा होती. सध्या राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे हे त्यांच्या सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये व्यस्त असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी सकाळी झाला. यास भालके यांची उपस्थिती अनिवार्य होती.
मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या आमंत्रणानुसार ते मंगळवारी दुपारी सोलापूरहून हैदराबादला जाणार होते. मात्र, हैदराबादहून आलेले विमान सोलापूरला येऊ न शकल्याने आज बुधवारी (ता.7) सकाळी भगीरथ भालके हे सहकुटुंब हैदराबादला रवाना झाले. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके व मुलगा देखील आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बी. आर. एस. पक्षाचे नेते शंकरराव धोंगडे हे मंगळवारी पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. त्यांनीही पत्रकारांशी बोलताना भालके हे बी. आर. एस. पक्षांमध्ये येत असल्याचे सुतोवाच केले. सोमवारी भालके यांनी मंगळवेढा येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी, आपण बी आर एस पक्षात प्रवेश अद्याप केलेला नसला तरी चंद्रशेखर राव यांची ध्येयधोरण त्यांनी शेतकऱ्यांविषयी केलेले काम हे पाहण्यासाठी हैदराबादला जात असल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. तीत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. चंद्रशेखरराव यांच्यासाठी देश मोकळा आहे. त्यांनी कोठेही आपला पक्ष न्यावा. त्याला विरोध असण्याच कांही कारण नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमचे जे लोक बीआरएसमध्ये जात आहेत त्यांच्या बद्दल फार चिंता करण्याची गरज नाही, असं म्हंटलयं.
राव यांच्या पक्षात पंढरपूरचे भालकेसह राज्यातील कांही नेते जात आहेत. याकडे पवारांच लक्ष वेधल्यावर ते म्हणाले, त्यांच्याकडे जे जात आहेत त्या बद्दल चिंता करण्याची गरज नाही. वर्ष-सहा महिने जावू द्या. अनुभव घेतल्यावर लोक निष्कर्षावर येतील. राव शेतकऱ्यांना जे पैसे वाटत आहेत. त्याचा परिणाम त्या त्या राज्याच्या अर्थकारणावर दिसेल असंही त्यांनी म्हंटलयं.
भगीरथ भालके हे राष्ट्रवादीचे नेते असून त्यांनी २०२१ ची पंढरपूरची पोटनिवडणूक लढवली होती व एक लाख ५० हजारांपेक्षा जास्त मते घेतली होती. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेली धूसफूस व विठ्ठल कारखाना निवडणुकीमध्ये भालके यांचा झालेला पराभव पाहता राष्ट्रवादीने पंढरपूरमध्ये पर्याय म्हणून अभिजित पाटील यांना पुढे केले आहे. त्यामुळे भालके काही दिवसांपासून नाराज होते. आता त्यांनी यावर बी आर एस हा पर्याय शोधला असल्याचे संकेत मिळत आहेत. भालके यांनी अधिकृतपणे बिआरएसमध्ये प्रवेश केला नसला तरी त्यांची वाटचाल या पक्षाकडे असल्याचे दिसत आहे.