पंढरपूर – अत्यंत चुरशीने झालेल्या तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अखेर सत्ताधारी कल्याणराव काळे यांच्या गटाने विजयाचा गुलाल उधळला. काळे यांच्या उमेदवारांनी पंधराशेहून अधिक मतांनी विजय मिळवताच अत्यंत उत्साही झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. कार्यकर्त्यांच्या या उत्साहामुळे काहीवेळा पोलिसांना लाठीमार देखील करावा लागला. Kalyanrao Kale retained the power of Sahakar Shiromani Bhalwani Abhijit Patil car stone pelting
तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी काळे यांच्या विरोधात विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, सहकार शिरोमणीचे माजी संचालक दीपक पवार व स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांनी दंड थोपटले होते. काळे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असल्याने त्यांनी विठ्ठलचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांच्यासह युवराज पाटील, गणेश पाटील यांच्याशी हातमिळवणी केली होती.
यासह ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी देखील काळे यांना पाठींबा दिला होता. यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. मागील पंधरा दिवसापासून दोन्ही गटाकडून एकमेकांवर मोठे आरोप प्रत्यारोप झाले. अनेकदा प्रचाराची पातळी देखील घसरली. कारखान्याची निवडणूक असून देखील याचा प्रचार विधानसभेप्रमाणे सुरू होता. यामुळे अखेर पर्यंत बाजी कोण मारणार याबाबत अंदाज लावणे अशक्य झाले होते. अखेर काळे यांनी अभिजीत पाटील यांच्या गटाचा 1500 ते 1600 मताच्या फरकाने पराभव करून कारखान्याची सत्ता अबाधित राखली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सहकार शिरोमणी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पासूनच माजी संचालक दीपक पवार यांनी काळे यांच्या विरोधात राळ उठवली होती. काळे यांनी थकविलेल्या ऊस बिल, कामगारांचे पगार तसेच ठेकेदारांचे बिल यावरून पवार यांनी विविध शासकीय विभागाकडे तक्रारी केल्या होत्या तसेच काळे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची सेबी, ईडीकडे तक्रार देखील केली होती. पवार यांच्या आंदोलनामुळे काही प्रकरणात काळे यांना माघार देखील घ्यावी लागली. पवार यांनी सहकार शिरोमणीची निवडणूक लढविण्याचे पूर्वीच जाहीर केले होते. कारखान्यावर परिवर्तन करण्यासाठी त्यांनी अभिजीत पाटील यांच्या बरोबर युती केली. मात्र अंतिमतः यामध्ये त्यांना यश मिळाले नाही.
दरम्यान शासकीय गोदाम येथे पार पडलेल्या मतमोजणीवेळी सकाळ पासूनच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. काळे यांनी अपेक्षित आघाडी घेतल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके फोडून जल्लोष सुरू केला. मतमोजणीच्या ठिकाणी काळे यांच्यासह भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील उपस्थित होते. तर या निवडणुकीमध्ये जोमाने प्रचार करणारे समाधान काळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विजयानंतर काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मिरवणूक काढली.
सहा महिन्यापूर्वीच्या सत्तेची घमेंड
विजयानंतर बोलताना कल्याणराव काळे यांनी सहकारामध्ये काही अप्रवृत्ती शिरल्या असल्याची टीका केली. सहा महिन्यापूर्वी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यामुळे हे दंड फुगवून फिरत आहेत. परंतु सभासदांनी त्यांचा माज उतरवला. विरोधकांनी पैश्याचा पाऊस पाडला, दमदाटी केली परंतु सभासदांनी 22 वर्षापासून असणार विश्वास कायम ठेवला.
या निवडणुकीत भालके, युवराज पाटील, गणेश पाटील देखील बरोबर होते. यामुळे खरा विठ्ठल परिवार देखील कोण आहे हे फुशारकी मारणार्यांना कळले असल्याचा टोला लगावला. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद आदी सर्व निवडणुका आम्ही विठ्ठल परिवार म्हणून एकत्रच लढणार असल्याचे काळे यांनी जाहीर केले.
पंढरपूर तालुक्यातील एका साखर कारखान्याची निवडणूक असून देखील मोठ्या चुरशीने लढली गेली. संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष लागले होते. प्रचारातील आरोप प्रत्यारोपामुळे कार्यकर्ते देखील जोशमध्ये होते. यामुळेच मतमोजणी दिवशी सकाळ पासूनच एकमेकांविरोधात दंड थोपटले जात होते.
○ अभिजित पाटील यांच्या गाडीवर दगडफेक
सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर अभिजीत पाटील यांनी या ठिकाणी हजेरी लावली. परंतु काही तासातच काळे यांच्या गटाने विजयी आघाडी घेतल्यामुळे ते शासकीय गोदामा बाहेर पडले.
यावेळी बाहेर लावलेल्या त्यांच्या गाडीची काच दगड मारून काही कार्यकर्त्यांनी फोडली. तसेच पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेर पडलेल्या अभिजीत पाटील यांच्या अंगावर देखील काही कार्यकर्ते धावून गेले. त्यांच्या गाडीचा पाठलाग करून गुलाल उधळण्यात आला.
तर मतमोजणी झाल्यानंतर दीपक पवार, डॉ.बी.पी.रोंगे बाहेर पडत असताना देखील उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांना पाहून मोठा गोंधळ घालण्यास सुरूवात केली. कार्यकर्ते त्यांच्या वाहनावर धावून गेल्याने अखेर पोलिसांना लाठीमार देखील करावा लागला. अभिजीत पाटील यांचा कार्यकर्ता असणार्या किरण घोडके याला काही हुल्लडबाज तरूणांनी मारहाण केली. सदर तरूणावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गोंधळ घालणार्या कार्यकर्त्यांना काळे, गणेश पाटील यांनी स्पिकरवरून शांतता राखण्याचे आवाहन देखील केले.
नंतर अभिजीत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपल्या संयमी भाषेत व्यक्त झाले आहेत.
याच वृत्ती विरुद्ध वैचारिक लढा उभारला होता.. लढा सुरूच राहील..
असो.. विजयाच्या विरोधकांना शुभेच्छा!!
विजयाच्या उन्मादात माझ्या गाडीवर दगड फेकून काच फोडणाऱ्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात कोणताही आकस, राग अथवा द्वेष नाही.. मी त्याला केंव्हाच माफ केले आहे आणि माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी पण मोठ्या मनाने त्या व्यक्तीला माफ करावे.