》महिला कलावंतांचा मात्र कडाडून विरोध
》 मोडनिंबमधील महासंघाच्या बैठकीत झाला निर्णय
सोलापूर : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात लोककला म्हणून ख्याती असलेली तमाशाची कला जिवंत ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न जुन्या पिढीतील कलावंत आजही करत आहेत. Modnimb Federation of Women Artists strongly protested against girls, ‘no entry’, DJ was also shown ‘stick’ राज्यात प. महाराष्ट्र व मराठवाड्यात आजही तमाशा कला केंद्र पहायला मिळतात. लावणी रसिक आजही दूरवर जाऊन लावणी, ढोलकी आणि घुंगरुचा आनंद घेत असतात पण ही रसिकता हरपत चालली असून तमाशा केंद्रांना आता डान्स बारची कीड लागली आहे. तिथे आंबट शौकिनांची गर्दी वाढू लागली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कलावंतानी चिंता व्यक्त केली असून आता यापुढे तमाशा कला केंद्रात अठरा वर्षाच्या मुलींना लावणी सादर करण्यासाठी उभे करू नये आणि डीजेलाही कला केंद्रात बंदी आणावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय तमाशा कलावंत, कलाकेंद्र, कलाकार आणि केंद्र मालकांच्या बैठकीत घेण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील तमाशा कलेचे माहेरघर असलेल्या माढा तालुक्यातील मोडनिंब येथे ही राज्यस्तरीय बैठक नुकतीच झाली. राज्यातील लावणी आणि तमाशा कलावंतांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्व तमाशा केंद्र, लावणी कलाकेंद्र येथील कलाकार, वादक, गायक आणि थिएटर मालक या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे यांच्या पुढाकाराने या बैठकीचं आयोजन केलं होतं.
या बैठकीमध्ये अठरा वर्षाच्या खालील मुलींना तमाशा केंद्रात कलावंत म्हणून आपली कला सादर करता येणार नाही आणि तमाशा, संगीत पायमध्ये डीजेला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. शासकीय नियमानुसार, १८ वर्षांखालील मुलींना कला केंद्रात कला सादर करणे गुन्हा ठरत असल्याने याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे १८ वर्षांपेक्षा लहान मुलगी कला केंद्रात नको अशी भूमिका जाहीर करण्यात आली.
याशिवाय डीजेमुळे पारंपरिक वादक आणि गायकांच्या पोटावर पाय येणार असल्याने डीजेवर देखील बंदी घालण्यात आल्याचे वसंत गाडे यांनी सांगितले. या निर्णयाला काही कलाकारांनी आक्षेप घेत हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं. या लहान मुलींना नाचण्याचे आणि गायनाचे शिक्षण दिल्याशिवाय त्या स्टेजवर कशा कला सादर करणार? अशी विचारणा यावेळी लावणी कलावंतांनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या लहान मुलींना नृत्याचे शिक्षण याच कला केंद्रात द्यावे लागते आणि त्या तयार झाल्यानंतर १८ वर्षानंतर त्यांना स्टेजवर कला सादर करायला पाठवले जातं, अशी भूमिका ज्येष्ठ लावणी कलावंत उमा इस्लामपूरकर यांनी मांडली. कोणत्याही कलाकेंद्रात १८ वर्षांपेक्षा लहान मुली स्टेजवर येणार नसल्या तरी त्यांना तयार करायला त्यांना कला केंद्रात यावेच लागेल, असे वैशाली वाफळकर यांनी सांगितले. या बैठकीतून आमचे प्रश्न सुटले असे वाटत नसल्याचे सांगताना आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने पुढाकार घेऊन त्यांना राहण्यासाठी शहरात वसतिगृह असली तर ते शिक्षण घेतील, असा दावा वैशाली यांनी केला.
● कोण गौतमी पाटील ?
सध्या आमच्या समाजातील केवळ ५ टक्के मुली परिस्थितीमुळे कला केंद्रात असून बाकीच्यांची मुले चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर आणि अधिकारी बनत आहेत. फक्त शासनाने आमच्या मुलांना शिक्षणासाठी पाठबळ दिले तर आमचे प्रश्न सुटतील, असा दावाही यावेळी वैशाली वाफळकर यांनी केला. यावेळी बोलताना कोण गौतमी पाटील असा सवाल करत अश्लील नृत्य करून ती काय करते सगळ्यांना माहित आहे, असे सांगत ५ किलोची घुंगरं पायात बांधून आणि नखशिखांत कपड्याने झाकून आम्ही आमची कला सादर करतो, असे सांगत या कलावंतांनी गौतमी पाटीलवर देखील निशाणा साधला.
● आंबट शौकिनांचा विळखा…
तमाशा कला केंद्रांमध्ये सांस्कृतिक परंपरा व शालिनता जपली जात होती परंतु आता आंबट शौकिनांचा या केंद्रांना विळखा पडत चालला आहे. तमाशा केंद्रात नौकरी देतो म्हणून अल्पवयीन मुलींना आणले जात आहे. तिथे डान्स बार पद्धतीचे नृत्य करायला लावून हे आंबट शौकिन पैसा कमावू लागले आहेत. त्यात या अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याचे प्रकारही उघडकीस आले. या विकृतीला आळा घालण्यासाठी महासंघाची भूमिका योग्य असल्याची प्रतिक्रिया लोककलेतील कलावंतांनी सुराज्यशी बोलताना दिली.