सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील सीईओंच्या कार्यालयात सोमवारी दुपारी भयानक राडा झाला. धनगर समाजाचे संतप्त कार्यकर्ते सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या दालनात घुसले आणि तेथील खुर्च्याची मोडतोड – तोडफोड केली. काचाही फोडल्या. घोषणाबाजीने वातावरण एकाएकी तापले. यावेळी सीईओ मनीषा आव्हाळे ह्या कार्यालयात नव्हत्या. वरच्या सभागृहात एका बैठकीत त्या व्यस्त होत्या. कार्यालयाची ही मोकळीक पाहून आंदोलनकर्त्यांनी आपला डाव साधून घेतला. The CEO’s office was ransacked and vandalized; Four people from Dhangar community were taken into custody
आरक्षणानुसार शिक्षक भरती करावी या मागणीसाठी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचे सांगण्यात येते. झेडपीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा अघोरी प्रकार घडला. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळल्याचे प्रकरण ताजे असतानाच जिल्हा परिषदेमध्ये धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातला. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दोन दिवसांच्या सुटीनंतर झेडपीचे कामकाज सुरू झाले. नेहमीप्रमाणे बाहेर आणि आत लोकांची वर्दळ होती. आव्हाळे यांचे दालन पहिल्याच मजल्यावर आहे. वरती यशवंतराव चव्हाण सभागृहात त्या अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत व्यस्त होत्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास धनगर समाजातील शरणू हांडे (रा सोलापूर), सोमलिंग घोडके (रा अक्कलकोट), धनाजी विष्णू गडदे (मंगळवेढा), अंकुश केरप्पा गरांडे (मंगळवेढा) हे कार्यकर्ते सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये अचानक आले. आव्हाळेंच्या दालनात घुसले. घोषणाबाजी करत आतील सर्व खुर्च्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. कार्यालयातील खिडक्यांच्या काचा फोडल्या. बाहेरील त्यांच्या बोर्डावर शाई फेकण्यात आली. खुर्च्या फेकून निषेध केला.
हा गोंधळ कानावर पडताच अधिकारी आणि कर्मचारी बैठक सोडून खाली आले. तोपर्यंत आंदोलकांनी दालनाची नासधूस करून टाकली. खबर मिळताच पोलिसांची तुकडी जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाली. या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात नेले.
जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावलीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये शिक्षक भरतीत धनगर समाजाच्या साडेतीन टक्के आरक्षणा नुसारच ही भरती व्हावी अन्यथा धनगर समाज पेटून उठेल, असा इशारा शरणू हांडे यांनी दिला. या घटनेनंतर जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी लगेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जाऊन सर्व तोडफोडीची पाहणी केली. त्यामुळे बराच वेळ जिल्हा परिषदेमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● अधिकारी व कर्मचारी यांनी केला निषेध
सीईओंच्या दालनाची तोडफोड करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने केली व या प्रकाराचा निषेध केला आहे. जिल्हा परिषेद मुख्यालयाचे मुख्य द्वाराजवळ येवून अधिकारी कर्मचारी यांनी एकजूट दाखवली. घोषणा देवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
” अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करून राजपत्रित संघटना आव्हाळे यांचे समवेत असल्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे, लिपिक वर्गीय संघटनेचे राजेश देशपांडे, कंत्राटी कर्मचारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सचिन जाधव, कर्मचारी संघटनेचे गिरीष जाधव, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण वंजारी, महिला कर्मचारी संघटनेच्या अनुपमा पडवळे, नागेश पाटील, दिनेश बनसोडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सचिन सोनकांबळे, सचिन मायनाळ, एस. पी. माने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
○ अधिकारी बेमुदत काम बंद करणार : शेळकंदे
जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या दालनाची मोडतोड करून निंदनीय अशा प्रकारचे कृत्य केले आहे. या घटनेचा अधिकारी यांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी निषेध व्यक्त केला.
● अशी झाली झटापट…
सीईओंच्या कार्यालयापुढे बंदोबस्तासाठी पोलीस असतो. बैठकीमुळे हे पोलीस सभागृहाजवळ होते, असे सांगण्यात येते. चौघे आंदोलक पळत येवून कार्यालयात घुसले तेव्हा तेथील सेवकाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. सेवक आणि आंदोलक यांच्यात झटापटही झाली. वेळीच पोलीस आल्याने आंदोलकांना जरब बसली.
● निंदनीय कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करा
सर्व अधिकारी यांच्या वतीने जिल्हा परिषदेमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी केला आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.