》 अहवालानंतरच दोषीवर कारवाई होईल
सोलापूर : रजेच्या कारणावरून सहशिक्षकाने मुख्याध्यापकाला मारहाण केल्याचा कुंभारी जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत अहवाल मागविण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली. Headmaster beaten up by a teacher until his ear was torn off; Kumbhari Solapur Zilla Parishad on Action Mode Education Officer
रजा नाकारल्यावरून कुंभारी जिल्हा परीषद शाळेतील महेश क्षीरसागर या शिक्षकाने मुख्याध्यापक सुभाषचंद्र पाटील यांना गुरुवारी सकाळी मारहाण केली होती. या घटनेमध्ये मुख्याध्यापकाचे कान फाटले असून, ते जखमी झाले आहेत. मुख्याध्यापक सुभाषचंद्र पाटील हे कामकाज करीत असताना रजेच्या कारणावरून क्षीरसागर नावाच्या सहशिक्षकाने मारहाण केली. ते कपाटातून फायली काढत असताना त्या शिक्षकाने मागून त्यांच्यावर हल्ला चढविला, असे जखमी मुख्याध्यापकांनी शासकीय रुग्णालयामध्ये उपचारास दाखल झाल्यावर पोलिसांना सांगितले.
शिक्षकाच्या मारहाणीत मुख्याध्यापक जखमी झाल्याचे पाहून गावातील प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधींनी रुग्णवाहिकेला पाचारण करून त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केले. क्षीरसागर यांनी मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक सुभाषचंद्र पाटील यांना रजा मागितली. परंतु आज शाळेत कार्यक्रम आहे, रजा देता येणार नाही, असे सांगत मुख्याध्यापक पाटील यांनी त्यांना रजा नाकारली. त्यामुळे संतापलेल्या क्षीरसागर याने मुख्याध्यापक पाटील यांना लाकडी दांडका व लाथाबुक्याने मारहाण केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
केंद्रप्रमुख कुंदा राजगुरू, कुंभारीचे सामाजिक कार्यकर्ते गजानन होनराव, स्वप्निल थिटे, ग्रामपंचायत सदस्य वंजारी, आप्पाशा चांगले यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले आणि जखमी मुख्याध्यापक पाटील यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठविले.
या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. त्यानंतर त्या शिक्षकाने वळसंग पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकानेच मारहाण केल्याची तक्रार दिली. वळसंग पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मुख्याध्यापक पाटील जखमी झाल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. या ठिकाणी तक्रार नोंद झाल्याने त्यांच्या फिर्यादीवरून सहशिक्षक क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
● प्रकरण खूपच गंभीर, कारवाईत हयगय नाही : मिरकले
संबंधित मारहाण प्रकरणातील सहशिक्षक आणि मुख्याध्यापक या दोघांच्या तक्रारीवरून पोलिसांनी काय केले व नेमका प्रकार काय घडला हे तेथे उपस्थित असलेल्या शिक्षकांकडून माहिती घेऊन सविस्तर अहवाल सादर करण्याबाबत दक्षिण सोलापूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्याला कळविल्याचे मिरकले यांनी सांगितले. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शाळेचे कामकाज सुरू असताना अशी घटना घडणे बरोबर नाही. हा प्रकार खूपच गंभीर आहे, त्यामुळे कारवाईबाबत हयगय केली जाणार नाही, असे मिरकले यांनी स्पष्ट केले.