श्रीपूर : केळीच्या रोपांचे दर १६ ते १९ रुपये एवढे असताना ७ रुपये प्रमाणे मिळालेले रोप ऐन थंडीत लावल्यानंतर शेतकऱ्यांनी उत्पादनाबाबत शंका व्यक्त केल्या मात्र त्याच बागेतील केळी आज आखाती देशात इराण येथे निर्यात होत आहे. वाचूया सोलापुरातील एक यशस्वी शेतक-याची कथा. Success Story of a Young Farmer: Solapur’s Bananas Exported to Gulf Countries Iran Malshiras Mahalung
माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील अमन मुलाणी या युवा शेतकऱ्याची ही यशोगाथा आहे . त्यांच्या केळीला २७ रुपये प्रमाणे दर मिळाला आहे. गत दोन वर्षांपासून काही काळ अपवाद वगळता केळीचे दर चांगले टिकून राहिले आहेत. त्यामुळे केळी लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक वाढला आहे. अशा परिस्थितीत केळी रोपे मिळवण्यासाठी तीन ते चार महिन्याअगोदर बुकिंग करावे लागते. अमन मुलाणी यांनी डिसेंबर २०२२ या ऐन हिवाळ्याच्या महिन्यात आपल्या अडीच एकर क्षेत्रात केळी लागवडीचा निर्णय घेतला. परंतु त्यांना रोपे उपलब्ध होत नव्हती. शिवाय केळीच्या रोपांचे दर रोपांचे दर १६ ते १९ रुपये दरम्यान होते.
रोपे वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अमन मुलाणी यांना ७ रुपये प्रमाणे केळीची रोपे मुंबई येथील मयंक गांधी यांच्या ग्लोबल विकास ट्रस्ट या संस्थेद्वारा उपलब्ध झाली. ग्लोबल विकास ट्रस्ट ही संस्था शेतकऱ्यांना ७ रुपये प्रमाणे केळीची रोपे पुरवून त्यावरील रक्कम रोप निर्मिती कंपन्यांना स्वतः अदा करते. त्याचा लाभ मुलाणी यांना झाला. ७ रुपये प्रमाणे मिळणाऱ्या रोपातून चांगले उत्पादन मिळण्यासंदर्भात शेतकरी शंका व्यक्त करू लागले. त्याशिवाय १६ डिसेंबरला बिगर हंगामी लागवड झाल्याने उत्पादनाबाबत शंका होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
परंतु अमन मुलाणी हे स्वतः कृषी पदवीधर आहेत. त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर करत केळीची दर्जेदार अशी बाग पिकवली आणि त्या बागेतील केळीची कटाई सध्या चालू आहे. त्यांनी लावलेल्या ३ हजार रोपांमधून कमीत कमी ५५ टन केळी निघणे अपेक्षित आहे.
अमन मुलाणी यांच्या बागेतील केळाच्या घडातील प्रति फणीला २४ केळी आहेत. बिगर हंगामी असल्याने घडाचे वजन २५ ते ३० किलो दरम्यान मिळत आहे. केळीची वादी लांब असल्याने ही केळी व्यापाऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्यांच्या केळीला २७ रुपये किलो प्रमाणे दर मिळाला आहे. अकलूज येथील रघुनाथ गायकवाड यांच्याव्दारा बेंगलोर येथील विग्रो प्रायव्हेट लि . ही कंपनी इराण येथे केळी निर्यात करत आहे. नवरात्र उत्सव तोंडावर असल्याने देशांतर्गत बाजारातही चांगली मागणी आहे.
साडेचार बाय सात फूट अंतरावर १६ डिसेंबरला लावलेली केळी बरोबर अकरा महिन्यांमध्ये काढणीस आली आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी खूप कसरत करावी लागली. यंदा केळीवर करप्याचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने वेळेनुसार फवारणी करावी लागली. सध्या केळीची उपलब्धता कमी असल्याने दर टिकुन राहील. या पुढील आठ महिन्यात खोडव्याचे पीक घेण्याचे नियोजन असल्याचे अमन मुलाणी (महाळुंग गट नं. २ ,ता. माळशिरस) यांनी सांगितले.
ग्लोबल विकास विकास ट्रस्ट ही संस्था मयंक गांधी यांनी संस्थापित केली आहे . या संस्थेद्वारा शेतकऱ्यांना केळींच्या रोपांंबरोबर इतर फळ पिकांची रोपे देखील माफक दरात दिली जातात. ही रोपे नामांकित कंपन्यांकडून खरेदी करून शेतकऱ्यांना दिले जाते. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या रकमेतील तफावत ही कंपनी स्वतः रोप कंपन्यांना अदा करते. आमचे कार्य सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात सुरू असल्याचे प्रवीण संघशेट्टी (सोलापूर जिल्हा प्रतिनिधी) यांनी सांगितले.