○ मराठा आरक्षण- पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
मुंबई : अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे हे मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आता माघार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे. लाखो मराठा बांधव हे अंतरवाली सराटीमधून जरांगे यांच्यासोबत चालताना दिसत आहेत. अंतरवालीतून त्यांनी पदयात्रा काढली आहे. दरम्यान, जरांगे पाटील हे सकाळी पत्रकार परिषदेत भावूक झाले होते.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकार अलर्ट झाले आहे. त्यातच आता शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. आरक्षण फेब्रुवारी महिन्यात अधिवेशन काळात मिळणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे. याबाबत चिंता करण्याचं कारण नाही, असे ते म्हणाले आहेत.
मुंबई- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना – मुंबई अशी पदयात्रा काढली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक बंदोबस्तासाठी 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या साप्ताहिक सुट्यासह सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे काल विधान केले आहे. राज्य सरकारने म्हटल्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात शोधण्याचे काम सुरू आहे. मागासवर्ग आयोग देखील नव्याने गठित केला आहे. फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेणार आहोत, असे शिंदे म्हणाले आहेत.
‘सरकार म्हणून माझी भूमिका संपली’
सरकार म्हणून माझी भूमिका संपली असून आपण आंदोलक म्हणून मनोज जरांगे-पाटलांच्या पायी मोर्चात सहभागी होणार असल्याचे आमदार बच्चू कडूंनी म्हटले. जरांगेंच्या मागणीनुसार सगे- सोयऱ्याच्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत, त्याला सरकारने परवानगी दिली, अशी माहिती त्यांनी दिली. अंतरवाली सराटीमधून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने जरांगेंच्या नेतृत्त्वात निघालेल्या पायी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडू बोलत होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सरकारला वेठीस धरण्यासाठी जरांगे-पाटील यांनी मोठी घोषणा केली. मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सरकारला वेठीस धरताना त्यांनी आंतरवाली सराटीमधूनच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे सरकारच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. एकीकडे रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आणि दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेसोबत मराठे मुंबईत आंदोलन करणार असल्याने एकनाथ शिंदे सरकारच्या अडचणीत भर पडली आहे.
54 लाख नोंदी आणि 45 वर्षांपासून लढा सुरु आहे. तरी सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं. ज्या सरकारला मराठ्यांनी गादीवर बसवलं. आज नोंदी मिळालेल्या असताना आरक्षण देऊ शकत नाही? गोरगरीबांची पोरं मरत असताना त्यांना हक्काचं आरक्षण का देत नाही? हा अन्यायाचा कळस झाला आहे. डोळ्यांदेखत आत्महत्या होत आहेत तरीही सरकारला झोप कशी लागते? या शब्दात त्यांनी सरकारवर प्रहार केला आहे.
मुंबईत मनोज जरांगे आंदोलन करुन नयेत यासाठी सरकारकडून अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले. अनेकदा सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि मला समजवण्याचा प्रयत्न झाला. बच्च कडूदेखील सरकारकडून जरांगेकडे समजूत काढण्यासाठी गेले होते. मात्र मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे ठाम असून जीव गेला तरी मागे फिरणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.
○ मनोज जरांगे यांच्या मुंबईकडे प्रवास
– आज 20 जानेवारी – पहिला दिवस : अंतरवाली ते मातोरी.
अंतरवालीतून पायी-वाहन यात्रेला सुरुवात. अंतरवालीतून सकाळी 9 वाजता निघाले असून कोळगाव ता. गवराई इथे दुपारचं जेवण झाल्यानंतर मातोरी ता. शिरूर इथे मुक्काम
– 21 जानेवारी – दुसरा दिवस : मातोरी ते करंजी बाराबाभळी.
मातोरीतून सकाळी 8 वाजता निघणार, तनपुरवाईला आणि पाथर्डी इथे दुपारी विश्रांती, बाराबाभळी-कारंजी बाट ता. नगर इथे मुक्काम
– 22 जानेवारी – तिसरा दिवस : बाराबाभळी ते रांजणगाव.
बाराबाभळीतून सकाळी 8 वाजता निघणार, सुपा ता. पारनेरे दुपारी विश्रांती, रांजणगाव ता. शिरूर इथे मुक्काम
– 23 जानेवारी – चौथा दिवस : रांजणगाव ते चंदन नगर, खराडी बायपास.
रांजणगावातून सकाळी 8 वाजता, कोरेगाव भिमा इथे दुपारी विश्रांती, चंदनगर-खराडी बायपास मुक्काम
– 24 जानेवारी – दिवस पाचवा : खराडी बायपास ते लोणावळा.
चंदन नगर, खराडी बायपास येथून सकाळी 8 वाजता निघणार, तळेगाव दाभाडे इथे दुपारी विश्रांती, लोणावळा इथे मुक्काम
– 25 जानेवारी – दिवस सहावा : लोणावळा ते वाशी
लोणावळाहून सकाळी 8 वाजता निघणार, पनवेल ता, नवी मुंबई इथे दुपारी विश्रांती, वाशी इथे मुक्काम
– 26 जानेवारी – दिवस सातवा: वाशी ते आझाद मैदान-मुंबई… वाशीतून सकाळी 8 वाजता निघणार, मुंबईतील परवानगी मिळालेल्या मैदानात उपोषणाला बसणार