सोलापूर – दि लक्ष्मी को ऑफ बॅंक हि १०५ कोटी रुपयाच्या एनपीएमुळे बॅंक अडचणीत आली त्यावर शासनाने बॅंकेवर प्रशासक मंडळ नेमले परंतु प्रशासकानी जर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या प्रशासकाप्रमाणे काम केले असते तर बँक वाचली असती, असे दि लक्ष्मी बॅंक बचाव समितीचे प्रा. काकासाहेब कुलकर्णी म्हणाले. The rescue committee would have saved Lakshmi Bank if the administrators had taken strict action
सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्वात जुनी ९३ वर्षांची बॅंक होती. सदर बॅंक ही छोट्या उद्योजकांना मदत करणारी बॅंक म्हणून परिचित होती. परंतु चुकीचे कर्ज वाटप, चुकीचे धोरण यासह अनेक कारणामुळे बॅंक अडचणीत आली. परंतु प्रशासकानी जर कठोर पावले उचलली असती तर बॅंक वाचली असती सोलापुरातील सर्वात जुन्या बॅंकेला जीवदान मिळाले असते.
परंतु यामुळे सोलापुरातील सहकार अडचणीत आल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांचीही भेट घेउन बॅंक वाचवण्यासाठी साकडे घातले होते त्यानीहि यासाठी प्रयत्न केले होते, असे कुलकर्णी यांनी म्हटले.
कोरोना काळात लक्ष्मी सहकारी बँक डबघाईला आली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. सोलापुरातील सहकार खात्याने बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ नियुक्त केले होते. सप्टेंबर 2022 रोजी बँकेचा परवाना रद्द झाल्याने प्रशासकीय मंडळ बरखास्त करून सहकार खाते अव्यवसायक मंडळ नियुक्त करणार आहे. हे अव्यवसायक मंडळ बँकेचे थकीत कर्जे 10 वर्षे वसूल करणार आणि दहा वर्षांनंतर लक्ष्मी सहकारी बँक इतिहास जमा होणार होणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ लक्ष्मी बँकेने अखेर ‘मान’ टाकली; आरबीआयकडून परवाना रद्द
सोलापूरच्या सहकारी बँकिंग क्षेत्रात वैभव प्राप्त केलेल्या श्री लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयकडून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे बँकेला आता टाळे लागणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईमुळे सोलापूरच्या बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सोलापूरच्या इतिहासात अशी कारवाई पहिल्यांदाच झाली आहे.
परवाना रद्द केल्यामुळे ही बँक कुठल्या बँकेत मर्ज करणार? शहर व जिल्ह्यातील शाखांमध्ये जे अधिकारी व कर्मचारी आहेत, त्यांचे काय करणार? आणि ठेवीदारांच्या रकमांचे काय करणार? हे यक्षप्रश्न
समोर आले आहेत. थकबाकीच्या खाईत गेलेल्या बँका अन्य बँका घ्यायला तयार नसतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे पण आरबीआय लक्ष्मी बँकेचे भवितव्य कशाप्रकारे ठरवणार? कोणता मार्ग अनुसरणार याकडे बँकिंग क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
बँकेचे ठेवीदार ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर दावा करू शकतात, असे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.. अशा स्थितीत हा एक मोठा दिलासा म्हणता येईल. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या बँकेने सोलापूरच्या बँकिंग क्षेत्रात लौकिक प्राप्त केलेला होता. पारदर्शक व काटकसरीच्या कारभाराने लक्ष्मी बँकेने स्वतःची ख्याती निर्माण केली होती.
शतकी मार्गावर असलेल्या या बँकेला एकाएकी दृष्ट लागली आणि गतवर्षी बँकेचे खरे दुखणे बाहेर पडले. कर्जाच्या थकबाकीचा डोंगर वाढत गेल्याने बँकेचे आर्थिक कंबरडेच मोडून पडले. या दुखण्याकडे अलिकडच्या संचालक मंडळाने गांभिर्याने पाहिले नाही व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मान डोलावून कर्ज प्रकरणांना मान्यता दिली.
शहरातील बड्या लोकांनीच कर्जे खिशात घालून बँकेची अक्षरशः लूटमार केली. सर्वसामान्यांच्या ठेवीतील पैसा मनमानीपणे वापरला. अखेर ही बँक शरपंजरी पडली.
संचालक मंडळ बरखास्त करून शासनाने सहकार खात्याचे अधिकारी नागनाथ कंजेरी यांची प्रशासक म्हणून बँकवर नियुक्ती केली. त्यांनी वसुली मोहीम प्रभावीपणे राबवून ठेवीदारांना काही अंशी दिलासा दिला पण बड्या धेंडांनी घेतलेल्या कर्जाची परतफेडच केली नाही. त्यामुळे बँकेने अखेर मान टाकली. एककाळ असा होता की बँकेकडे ठेवीदारांची रांग असायची पण बँक गॅसवर येताच अधिकाऱ्यांना थकबाकीदारांच्या दारात जाण्याची वेळ आली.
□ सोलापूरच्या पूर्व भागात लक्ष्मी ही एक नावाजलेली बँक होती. याच भागात औद्योगिक बँक व सोलापूर नागरी औद्योगिक बँक अशा दोन बँका होत्या. त्या संचालकांच्या खाबुगिरीने बंद पडल्या. आता बंद पडणारी ही लक्ष्मी ही तिसरी बँक ठरेल.
■ लक्ष्मी बँकेची स्थापना ६ जून १९२९ रोजी सोलापुरात काही यशस्वी वकिलांच्या योगदानाने झाली. ज्यामध्ये अधिवक्ता कै. गणेश दादाजी पुंडे, अधिवक्ता एस. एन. जमादार, डॉ. के. बी. अंत्रोळीकर यांचा सक्रिय सहभाग होता. लक्ष्मी ही पैशाची देवता आहे, असे म्हटले जाते, प्रत्येक धर्माची देवावर श्रद्धा आहे. या कारणास्तव बँकेचे नाव लक्ष्मी असे ठेवण्यात आले आहे.
बॉम्बे को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायद्याद्वारे दिनांक ६ जून १९२९ रोजी याची यशस्वीपणे नोंदणी झाली. अधिवक्ता कै. गणेश दादाजी पुंडे हे बँकेचे पहिले अध्यक्ष झाले. सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सामाजिक कारणासाठी बांधील असलेल्या सदस्यांच्या गटाने ही बँक उभी केली. या बँकेने २०१२-१५ च्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सोलापूरमधील सर्व सहकारी बँकांमध्ये ठेवींचा विक्रम करून विशेष पारितोषिक मिळवले होते.