बार्शी : बार्शी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोविड केअर सेंटरसाठी महाविद्यालयाचा ताबा देण्यास नकार दिल्यामुळे तालुक्यातील सासुरे येथील साई आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड यांच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मंडळ अधिकारी कार्यालयातील महमद हनीफ हुसेन तांबोळी यांनी फिर्याद दिली. बार्शी-सोलापूर रस्त्यावर सासुरे फाट्याच्या पुढे साई आयुर्वेदिक महाविद्यालयाची प्रशस्त इमारत आहे. सध्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील विशेषत: वैराग येथील रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे या महाविद्यालयाच्या इमारतीची तातडीची गरज निर्माण झाली आहे.
या इमारतीच्या अधिग्रहणाबाबत यापूर्वीच जिल्हाधिकार्यांनी आदेश दिलेले आहेत. मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे विद्यमान परिस्थितीत तहसीलदार यांच्या आदेशाने सासुरे येथील तलाठी शेखदार हे इमारतीचा ताबा घेण्याबाबतचे पत्र देण्यासाठी प्राचार्यांकडे गेले असता त्यांनी ते घेतले नाही. त्यामुळे मंडळ अधिकारी कार्यालयाने त्यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता त्यांनी इमारत ताब्यात देण्यास टाळाटाळ केली, नंतर मोबाईलच बंद केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.