तुळजापूर : तुळजापूर शहरामध्ये आलीकडच्या काळात कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तुळजापूर शहरात २२ ते २६ जुलै या कालावधीत सलग चार दिवस जनता कर्फ्यु करण्यात येणार आहे. येत्या बुधवारपासून कडक लॉकडाऊन केला जाणार आहे.
शहरामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे तुळजापूर नगरपरिषद कार्यालयात कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारी पञकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी पञकार परिषदेत बोलताना तुळजापूचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ही माहिती दिली.
यावेळी तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, नगरसेवक अमर मगर, पंडितराव जगदाळे, विजय कंदले, सुनील रोचकरी, विशाल रोचकरी, रणजीत इंगळे, नानासाहेब लोंढे, अभिजित कदम, माऊली भोसले, आनंद कंदले, नगपरिषद अधीक्षक वैभव पाठक आदीसह न.प.कर्मचारी उपस्थित होते.
तहसीलदार सौदागर तांदळे यांनी तुळजापूर शहरात वाढता कोरोना प्रादुर्भाव होत असल्याने बुधवारपासून रविवारपर्यत सलग चार दिवस जनता कर्फ्यु असणार असल्याचे सांगितले. तरी नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये असे आवाहन केले. या चार दिवसाच्या कालावधीत फक्त हाँस्पीटल व क्लिनिकजवळील मेडीकल चालू असणार आहेत तसेच दुध विक्रेते सकाळी ६ ते ९ या कालावधीत चालू राहील.
त्याचबरोबर शहरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. मंगळवारपासून धार्मिक श्रावन मास सुरु होत असल्यामुळे संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे तुळजापूर तालुक्यातील श्री महादेव मंदिरात श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी कोणत्याही मंदिरात जाऊ नये. पुढील आदेश येईपर्यंत तालुक्यातील कोणतेही मंदीर उघडणार नाहीत. शहरातील व तालुक्यातील श्री महादेव भक्तांनी व नागरिकांनी आपल्या घरीच श्रावण माहिन्यात महादेवाची पूजा करावी, असे आवाहन केले आहे.