सोलापूर : अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन पार पडणार असून, याची तारीखही ठरली आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का?, असा सवाल शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना केला आहे. सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोरोना विषाणू फैलावाच्या परिस्थिती सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पवार सोलापुरात आले होते. आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी कोरोना संकटाच्या मुद्यावरून मोदी सरकारला चिमटे काढले. अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिराच्या निर्माणाला ५ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मंदिराच्या भूमिपूजनासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. सध्या कोरोना नष्ट व्हावा, अशी सर्वांची इच्छा आहे. त्याला प्राधान्य दिले पाहिजे. मात्र काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल, अशी टीका शरद पवार यांनी सोलापूर येथील पत्रकार परिषदेत केली आहे.
शरद पवार म्हणाले की, “कोरोनाचे संकट सध्या संपूर्ण विश्वात पसरले आहे. संकटात अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोनापेक्षाही राम मंदिराचा मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटत असेल, मला माहित नाही, असे टोला पवारांनी लगावला.
कदाचित मंदिर बांधल्याने कोरोना निघून जाईल, म्हणून ते राम मंदिराचे भूमिपूजन करत असतील, मला माहित नाही, असा टोला पवारांनी लगावला.
सोलापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे हे सोलापूर येथे आले होते. ग्रामीण महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये सोलापूरचा समावेश होत असून ही चांगली बाब नसल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.
“कोरोनाचे संकट सध्या संपूर्ण विश्वात पसरले आहे. संकटात अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोनापेक्षाही राम मंदिराचा मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटत असेल, मला माहित नाही”
– शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष