नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटानंतर इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचा संघ देखील मागील जून महिन्यात तीन कसोटी आणि तीन टी20 मालिकेसाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा संघ सुद्धा तीन टी20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी चार सप्टेंबरपासून इंग्लंड दौर्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
कोरोनाच्या अभूतपूर्व संकटानंतर सर्वच क्रीडा क्षेत्राप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यानंतर कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून अनेक उपाय योजना आखत 8 जुलै पासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेस सुरवात करण्यात आली.
त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा संघ सप्टेंबर मधील 4, 6 आणि 8 तारखेला तीन टी20 व 10, 12 आणि 15 तारखेला तीन एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याचा विचार करत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ खासगी विमानाने इंग्लंडकडे रवाना होईल आणि हे सर्व सहा नियोजित सामने मॅनचेस्टरमधील साऊथॅम्प्टन आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळले जाण्याची शक्यता आहे.