अहमदनगर : महाराष्ट्रात कोरोनाचे संकट उभे ठाकलेले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. तर दुसरीकडे दूधाला दर मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी दूध आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दुधाला 30 रुपये भाव द्या या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. नगरमध्ये दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. मात्र, हे आंदोलन करत असताना सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे.
डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, सुरेश नवले, शुभम आंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. रोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवर दगडाला दुधाचा अभिषेक करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करणार, असल्याचंही संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
प्रमुख मागण्यासाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर आणि सांगलीतही आंदोलनाची सुरुवात झाली आहे, अशी माहिती दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ.अजित नवले यांनी दिली.
* दूधदरासंदर्भात उद्या दुपारी मंञालयात बैठक
दूध दरासंदर्भात उद्या दुपारी २ वाजता मंत्रालयात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीला माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना ही निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील राज्य सुकाणू समितीचे राज्य सदस्य अनिल देठे पाटील,अकोले येथील रोहिदास धुमाळ आणि राहुरी येथील मधुकर म्हसे यांना या बैठकीला निमंत्रण देण्यात आले आहे. शेतकरी संघटना तसेच प्रशाकीय अधिकारी हे बैठकीत उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.