बार्शी : कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यास टाळाटाळ करुन कर्तव्यात कसूर करणार्या दोन आरोग्य कर्मचार्यांवर शहर पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी फिर्याद दिली आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ ए.एन. मुंढे व सहायक डी.जी. तोटावार यांची तीन क्रमाकांच्या पथकात नियुक्ती करण्यात आली होती. या पथकावर प्रत्येक शुक्रवार, शनिवार व तिसरा रविवार या दिवशी स्वॅब घेण्याची जबाबदारी होती.
बार्शी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.एस. शितोळे यांनी तोटावार हे स्वॅब घेणेकामी अनुपस्थितीत राहिल्याचे तर मुंढे हे उपस्थित असूनही त्यांना आवश्यक सुरक्षा साधने परिधान करून स्वॅब घेण्यास सांगितले असता त्यांनी काम करण्यास नकार दिला असल्याचा अहवाल तालुका अरोग्य अधिकार्यांना दिला होता. त्यावरुन त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.