सोलापूर : सोलापूर सकाळचे मुख्य शहर बातमीदार विजयकुमार सुरेश सोनवणे (वय 47) यांचे रविवारी राञी निधन झाले. फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार सोनवणे यांच्यावर आज सोमवारी सकाळी रूपा भवानी जवळील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांची अंत्ययात्रा सकाळी आठ वाजता राहत्या घरापासून (सूर्यकांत निवास, शरदचंद्र पवार महाविद्यालयासमोर, उमानगरी) निघाली. यावेळी विविध स्तरातील लोकांची उपस्थिती होती. माजी महापौर मनोहर सपाटे, आरिफ शेख, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे, माजी उपायुक्त अनिल विपत, शिवसेनेचे विजय पुकाळे, महापालिकेकडून कोविड सनियंञण अधिकारी धनराज पांडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद गोसंकी, ज्येष्ठ पञकार अविनाश कुलकर्णी, शिवाजी सुरवसे, प्रशांत कटारे, किरण बनसोडे, परशुराम कोकणेसह सर्व पञकार बांधवांची उपस्थिती होती.
सोलापुरातील दैनिक विश्वसमाचार मधून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळच्या सोलापूर आवृत्तीत ते सन 2000 पासून कार्यरत होते. नगरविकास, महापालिका प्रशासन, राजकारण, शहरी भागाचे प्रश्न, सर्वसामान्य व हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या प्रश्नावर त्यांचा गाढा अभ्यास होता. सोलापूरला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्य शासनाच्या “राजमाता जिजाऊ स्वावलंबन जिल्हास्तरीय उत्कृष्ट पुरस्काराने 2007 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
सोलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना सोलापूर महापालिकेच्यावतीने आदर्श पत्रकार म्हणूनही सन्मानित करण्यात आले आहे. विविध संस्था व संघटनांनी त्यांच्या पत्रकारितेची दखल घेऊन त्यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरातील दयानंद कला महाविद्यालयात झाले आहे. त्यांच्या पश्चात एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
“सकाळचे ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार सोनवणे यांच्यामुळे एक सच्चा प्रामाणिक पत्रकार हरपला आहे. अभ्यासू, सरळ आणि सच्चा पत्रकार आपल्यातून निघून गेला. ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे.”
– सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री