नागपूर : विदर्भातील अकोला मुर्तिजापूर मार्गावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील नागठाणा फाट्याजवळ झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात काल सोमवारी दुपारच्या सुमारास झाला. नागपूरहून मुंबईकडे जाणार्या एका कारला विरूध्द दिशेने येणार्या कंटेनरने मुर्तिजापूर नजीक महामार्गावर जोरदार धडक दिली. कंटेनरने कारला समोरासमोर जबर धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ४ जण जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले.
नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या कारला (एमएच ०४ बीडब्ल्यू ५२५९) अमरावतीकडे जाणाऱ्या कंटेनरने (एमएच १५ एफव्ही १४१३) धडक दिली. धडक एवढी जबर होती की कारमधील सर्व जण बाहेर फेकले गेले. कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात बुरहान मुस्तफा दिलावर (वय २५), फातिमा गुलाम हुसेन (वय ४५), तसलिम हुसेन (वय ३), बुराहदीन हुसेन (वय ६ महिने) असे चौघे जण घटनास्थळीच ठार झाले.
तर गुलाम हुसेन (वय ५०), साबीया हुसेनहबीब (वय ३०) आणि हुसेन हबीब मो.हबीब (वय ३५) हे तीन जण गंभीररित्या जखमी झाले. तिन्ही जखमींना मुर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील उपचाराकरिता अकोला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.