भोपाळ : भाजपचे ज्येष्ठ नेते, मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ‘बाबूजी नहीं रहे…’, असे त्यांनी ट्विट करत, लालजी टंडन यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आशुतोष टंडन यांनी दिली.
मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. याबाबतची माहिती त्यांचा मुलगा आशुतोष यांनी ट्विटरवरून दिली आहे. लालजी टंडन यांच्या निधनाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद,पंतप्रधान नरेंद्र मोदी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मध्य प्रदेशचे राज्यपाल श्री. लाल जी टंडन यांच्या निधनानंतर, आपण एक दिग्गज नेता गमावला आहे, ज्यांनी लखनौच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक प्रगती साठी अतोनात काम केले त्यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो असे ट्विट केले आहे.
लालजी टंडन गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. लखनऊमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी 5.35 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबाबत मध्य प्रदेशमध्ये पाच दिवस तर उत्तर प्रदेशात तीन दिवस राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि किडणीसंबधीत त्रास असल्याने लालजी टंडन यांना 11 जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती सोमवारी ढासळल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. टंडन यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.