बार्शी : बार्शी तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरलेल्या बोगस डॉक्टरवर अखेर दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. या भोंदूवर यापुर्वीच कारवाई झाली असती तर काही गावांमध्ये आता अकस्मात जी रुग्णवाढ झाली आहे, ती झाली नसती. त्यामुळे या भोंदूला वारंवार पाठीशी घालणार्यावर वरिष्ठांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
श्रीमंत हरिश्चंद्र खंडागळे (रा. राऊत चाळ ता. बार्शी) असे या भोंदू डॉक्टरचे नाव असून त्यास आता क्वारंनटाईन करण्यात आलं आहे. त्याने अनेक गावांमध्ये फिरुन घरोघरी जावून कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ऍलोपॅथीची औषधे, इंजेक्शन, सलाईन दिल्याचे उघडकीस आले आहे.
या भोंदू डॉक्टरने उपचारात वेळ घालविल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी तालुक्यात पहिला कोरोनाबळी गेला होता. त्याचवेळी याचे कारनामे उघड झाले होते. कसल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण झालेले नसतानाही केवळ राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्तामुळे हा भोंदू परिसरातील अनेक गावांमध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्यांवर उपचार करत होता.
त्या रुग्णांचा त्रास खूप वाढल्यांनतर आपले हात झटकून त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवित होता, मात्र रुग्ण सिरीयस झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आल्यामुळे डॉक्टरांच्या उपचारालाही मर्यादा येत होत्या. त्यातच पहिला कोरोना रुग्ण दगावला होता. यावेळी या भोंदू डॉक्टरचा रोल उघड झाला होता. अरोग्य प्रशासनास त्याने औषधोपचार केलेल्या रुग्णांची माहिती त्याचवेळी मिळाली होती. तरीदेखील त्याच्यावर त्यावेळी कोणतीच कारवाई केली गेली नाही.
त्यामुळे सोकावलेला हा डॉक्टर आपला बेजबाबदार धंदा तसाच पुढे चालू ठेवून तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्यास कारणीभूत झाला आहे. त्याच्याविरोधात आता महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम व भारतीय साथरोग नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.