अकलूज : राजकारणात कोण कोणाचे दुश्मन नसते आणि कोण कोणाचे मित्रही नसते असे म्हटले जाते. बदलत्या राजकीय प्रवाहात बदलता आले पाहिजे हा राजकारणाचा नवीन नियम लक्षात घेतला तर तो तंतोतंत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अंगीकारलेला दिसत आहे. त्यांनी नव्या राजकीय अध्यायाला सुरुवात केली आहे.
नुकतीच त्यांनी एकेकाळी मोहिते पाटील कट्टर विरोधक असणाऱ्या संजीवनीताई पाटील यांची भेट घेत आस्थेवाईकपणे चौकशी केली. बदलत्या राजकारणाची सकारात्मकता त्यांच्यात यानिमित्ताने दिसून आली हे खरोखरच आदर्शवत असल्याची भावना सध्या तालुक्यातून व्यक्त होताना दिसत आहे.
माळशिरस तालुक्यातील मागील काही वर्षांचा राजकीय इतिहास तपासला असता मोहिते पाटील आणि संजीवनीताई पाटील हे राजकारणातील कधीही एक न होणारे दोन टोक समजले जात होते. पूर्वीपासून भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असणाऱ्या संजीवनीताईंनी नेहमीच पक्षनिष्ठा जपली. त्यांनी नेहमीच आपल्या पक्षाशी इमानेइतबारे कार्य केले. पण बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये मोहिते पाटील हे भाजपावाशी झाले. आणि मोहिते पाटील गटाचे नायक असणारे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्व हे बदलत्या राजकीय घटनांचा वेध घेणारे नेतृत्व असल्याने जुन्या नव्यांचा ताळमेळ साधत तालुक्यातील भाजपाच्या एकीकरणासाठी प्रयत्नशील असताना दिसत आहेत.
यासाठी मध्यंतरी त्यांनी भाजपातील जुन्या जेष्ठ नेत्यांबरोबर ‘शिवरत्न’ बंगल्यावर बैठक घेत संवाद साधत विविध अडीअडचणी जाणून घेतल्या. पक्षामध्ये आपण नवीन आहोत पण जुन्या राजकारणासाठी वाद-विवाद नकोत, एकमेकांमध्ये गैरसमज नकोत, पक्ष पुढे न्यायचा असेल तर सर्वांची एकता हवी या व्यापक दृष्टिकोनातून आमदार रणजीतसिंह हे सध्या सक्रिय सहभाग घेऊन कार्य करताना दिसत आहेत. नुकतीच त्यांनी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा, माजी जि. प. सदस्या व माजी सरपंच संजीवनीताई पाटील यांची त्यांच्या ‘सत्यम’ या निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीमध्ये त्यांनी त्यांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली व भाजपाच्या ध्येय धोरणासह अनेक विषयावर चर्चा केली. जुन्या जळमटांना तिलांजली देत व्यापक दृष्टिकोनातून त्यांनी निसंकोचपणे संवाद साधला. खरोखरच या भेटीने माळशिरस तालुक्यात एका नव्या राजकीय अध्यायाला सुरुवात झाली असून कटू राजकारणाला पूर्णविराम मिळालेला आहे. भाजपाचे बाळासाहेब सरगर ,बाळासाहेब वावरे यांच्या निवासस्थानी जाऊनही त्यांनी जुन्या जाणत्यांना विश्वास दिला आहे.
नव्या राजकारणाची नांदी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सर्वांना बरोबर घेऊन केली असल्याचे यानिमित्ताने बोलले जात असून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची राजकीय प्रगल्भता यानिमित्ताने स्पष्टपणे जाणवू लागली आहे. त्यामुळेच माळशिरस तालुक्यातील राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे…!