सांगली : शिराळ्याची सर्जेराव नाईक बँक बोगस बँक व्यवहारामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आता गाजू लागली आहे. या बँकेवर शासनाने नुकतीच प्रशासक नियुक्ती केली आहे.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतूनही तक्रारी वाढल्या आहेत. प्रचंड गर्दीने गेले काही दिवस बँकेचे मुख्यालय असलेल्या शिराळ्यात कापरी नाका परिसर गाजत आहे. तक्रारदारांनी बँक प्रशासनाकडे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन आता बँकेचे प्रशासक उपनिबंधक सहकारी संस्था मिरज यांनी केले आहे.
शिराळा येथील सर्जेराव दादा नाईक सहकारी बँकेतील बोगस कर्ज व्यवहार प्रकरणांच्या नोटिसा ज्या लोकांना मिळाल्या असतील त्या लोकांनी बँक प्रशासकाकडे तक्रारी निवेदनाच्या माध्यमातून नोंदवाव्यात. सगळीकडून मिळालेल्या तक्रारीतून एकच सार्वजनिक तक्रार शिराळा पोलीस ठाण्याकडे प्रशासकाकडून दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे प्रशासक उपनिबंधक सहकारी संस्था मिरज आदिनाथ दगडे यांनी दिली.
येथील सर्जेराव दादा नाईक सहकारी बँकेत झालेल्या बोगस कर्ज व्यवहार प्रकरणी प्रशासक आदिनाथ दगडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावेळी बँकेचे जनरल मॅनेजर दिलीप पाटील व अकाउंटंट पांडुरंग कुंभार उपस्थित होते.
बँक प्रशासकाकडून या १७६१ कर्जदारांना नोटिसा पाठविल्यानंतर यामध्ये अनेक डमी कर्जदार असल्याचे आढळून आले आहे. नोटिसा मिळाल्यानंतर आम्ही कर्ज काढलेले नाही तर आम्हाला नोटीस कशी काय आली, अशी विचारणा अनेकांकडून होऊ लागली आहे. कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यातूनही या तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढू लागला आहे. बोगस कर्जांच्या संदर्भात प्रशासकाकडे आलेल्या तक्रारीवरून या बँकेत डमी कर्जांचे वाटप यापूर्वीच्या कालावधीत करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ज्यांच्या संदर्भात असे प्रकार घडले आहेत. ते नागरिक त्यांच्या जवळ असणाऱ्या पोलीस ठाणे मध्ये तक्रारी नोंदवित आहेत. सगळीकडून या तक्रारी नोंदवल्या जात असल्याने यामध्ये फारच मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे. ज्यांच्या संदर्भात अशा घटना घडलेल्या आहेत, अशा तक्रारदारांनी बँक प्रशासकाकडे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, जेणेकरून सर्वांच्या तक्रारी एकत्रित करून या सर्व तक्रारी एकाच ठिकाणी शिराळा पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात येतील.
सर्वांच्या तक्रारी एकाच पोलीस स्टेशनला दाखल झाल्यामुळे आगामी काळातील कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यास सुलभता निर्माण होणार आहे. याकरिता ज्यांच्या बाबतीत अशा बोगस कर्जांच्या नोटिसा मिळालेल्या आहेत. त्या सर्व लोकांनी शिराळा येथे बँक प्रमुख कार्यालयात येऊन प्रशासकाकडे लेखी तक्रारी नोंद कराव्यात, असे आवाहन केले आहे.