भंडारकवठे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे नुकतेच नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू झाले आणि अप्पर तहसीलदार म्हणून उज्वला सोरटे यांची नियुक्ती झाली. नियुक्ती होऊन अजून १ वर्ष पूर्ण झाले नसताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीपैकी २० गावच्या सरपंचांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे बदली करण्याची मागणी केली आहे.
२० गावांच्या निवेदनामध्ये सरपंचांनी मंद्रूपचे अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये शासनाचे कामे करत असताना शेतकऱ्यांचे पाणंद,अंतर्गत रस्ते मजबुतीकरण,स्मशानभूमी मुरमीकरण करणे, तसेच गावातील शेतक-यांचे क्षेत्रातील बांध बदिस्त करण्यासाठी खाजगी शेत जमिनीतून मालकांच्या संमतीने मुरूम उपसा करण्यासाठी शासनाची रॉयल्टी भरून घ्या, अशी मागणी केली असताना देखील ती भरून घेतले जात नाहीत. चौकशीचा बहाणा करून तलाठी- सर्कल यांना पाठवून शेतकऱ्यांवर कारवाईची भीती घालणे, चालू असलेली कामे बंद करणे, फोटो व व्हिडिओ शुटिंग काढून शेतक-यांना बोलवून तहसीलदार हे तडजोड केली जाते, तडजोडीनंतर तोंडी कामे करण्यास परवानगी दिली जाते तर अशा अनेक समस्या शेतक-यांना येत असल्याने मंद्रुप अपर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांची बदली करण्याची मागणी केली आहे.
तसेच ठेकेदार यांनी सुद्धा मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी शासकीय कामे करत असताना शासनाने रॉयल्टी अगोदरच घेतलेले असते परंतु उज्ज्वला सरवटे हे काम चालू होण्याच्या अगोदर ठेकेदाराकडून अगोदरच रोख स्वरूपात पैसे भरून घेतले जातात, पैसे न भरल्यास शासकीय कामे करताना अडथळा आणले जाते. त्यामुळे ठेकेदाराचे आर्थिक नुकसान होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
* या वीस गावांनी दिले निवेदन
– भंडारकवठे, कंदलगाव, गुंजेगाव, अकोले मंद्रूप, मनगोळी, तेलगाव(भिमा) येळेगाव, विंचूर, सादेपूर, लवंगी, माळकवठे,कुरघोट, टाकळी, बरुर, कुडल -संगम, चिंचपूर, बाळगी, सादेपुर, गावडेवाडी, हत्तरसंग आदी गावांच्या सरपंचांनी लेखी निवेदन उपमुख्यमंत्र्यांकडे दिले आहे.
“तहसीलदार यांच्याकडे कामानिमित्त गेलेल्या शेतक-यांना माझा वशिला मोठा आहे, हे कोणी माझे काही करु शकत नाही, असे म्हणतात. त्यामुळे त्यांच्याकडे गेलेला शेतकरी हा घाबरतो, अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांची कामे होत नसतील तर अशा भ्रष्ट अधिका-याला पदावर राहाण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या तहसीलदाराची बदली करावी, अन्यथा लॉकडाऊननंतर मंद्रूप तेरामैल महामार्गावर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल” – सुभाष पाटील, (अध्यक्ष, राष्ट्रवादी दक्षिण सोलापूर)
या सर्व बाबतीत त्यांची बाजू ऐकूण घेण्यासाठी दक्षिण सोलापूर मंद्रूप अपर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. यावर त्यांनी या विषयावर काही बोलायचे नाही, असे ‘सुराज्य डिजिटल’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.