उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नजमध्ये एकाच दिवशी १७ कोरोना बाधित सापडल्याने मार्डीनंतर नान्नज हॉटस्पॉट झाला असून आरोग्य विभागाच्या वतीने रुग्ण वाढू नये म्हणून विविध उपाय योजले जात आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग थोपविण्यासाठी, रुग्णसंख्या मी करण्यासाठी उत्तर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने तालुक्यातील ११ गावात घरोघरी जाऊन रॅपिड टेस्टिंग चालू करण्यात आली आहे. नान्नज गावात जवळपास ११०० टेस्टिंग करण्यात आल्या. यामध्ये एकूण १७ रुग्ण संशयित आढळले असून ते पॉझिटिव्ह आले.
एकाच दिवशी तब्बल १७ कोरोना रुग्णामुळे नान्नज गाव हॉटस्पॉट बनले आहे. मार्डी मध्ये हे गाव केवळ एक रुग्णाच्या मृत्यूनंतर हॉटस्पॉट झाले. मार्डी गावातील रुग्ण संख्या आटोक्यात आली. उत्तर तालुक्यातील कोरोना ग्रस्ताची संख्या १७१ झाली असून ती पावणे दोनशे कडे वाटचाल चालू आहे. अजूनही काही अहवाल प्रलंबित आहेत. पुढे वाढ होऊ नये म्हणून गावातील पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी चालू असल्याचे सरपंच अविनाश मार्तंडे यांनी सांगितले.