सांगली : शिराळ्यात नागपंचमी दिवशी लाखोंची उपस्थिती असते. गुलालाची उधळण होत असते. मिरवणूक व पूजाविधी असा उत्सव दरवर्षी साजरा होतो. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आणि जिल्ह्यात जाहीर झाला आहे. त्यामुळे उत्सव रद्द झाला आहे. शिराळ्याच्या धार्मिक परंपरेचे मात्र पालन होणार आहे. यात शासन निर्देशांचे पालन करावे लागणार आहे. यात्रा, मिरवणूक होणार नाही.
जिल्हाधिकारी सांगली यांनी सांगली जिल्ह्यामध्ये 22 ते 30 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. नागपंचमी 25 जुलै रोजी आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात शिराळा नागपंचमी संदर्भात बैठक झाली. यावेळी या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या बरोबरच शहराच्या नगराध्यक्षा अर्चना शेटे व मुख्याधिकारी योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शेटे यांनी अंबा माता पूजन व पालखी विधीची बाजू मांडली मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी 4 लोकांच्या उपस्थितीत पाच वेळ देवी पूजन आणि एक तासाच्या अवधीत 6 लोकांच्या उपस्थितीत पारंपरिक पालखी पूजन होईल आणि परंपरेचे पालन होईल, असे स्पष्ट केले.
दरवर्षी श्रावण महिन्यात पंचमी दिवशी शिराळ्याचा नागपंचमी उत्सव साजरा होतो. पंचमी दिवशी व नंतरच्या आठवडाभरात लाखो भाविकांची उपस्थिती असते. उधळला जाणारा गुलाल व अंबामातेच्या नावानं चांगभलं चा गजर, नागपंचमी उत्सवाचे मोठे वैशिष्ट्य असते. पंचमी दिवशी देशभरातून लाखो भाविक येत असतात. मात्र लॉकडाऊन असल्याने व कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतलेली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली येथे झालेल्या नागपंचमी संदर्भात बैठकीस, डीवायएसपी श्रीकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक विशाल पाटील, वनपाल सुशांत काळे, अंबामाता ट्रस्टचे उपाध्यक्ष सम्राट शिंदे व विश्व प्रतापसिंह नाईक, यांची उपस्थिती होती. शिराळ्याच्या नगराध्यक्ष अर्चना शेटे व मुख्याधिकारी योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.