उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परीसरात उभारण्यात आलेल्या उस्मानाबाद कोविड-19 तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज गुरुवारी ऑनलाईन पध्दतीने झाले.
कोरोना विषाणूच्या संकटाने सर्व जग ग्रासले असून या विषाणूची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात 131 प्रयोग शाळा उभारण्यात आल्या आहेत. राज्यातील जनतेला आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून या माध्यामातून महाराष्ट्र हे देशातीलच नव्हेतर जगातील सर्वोच्च व सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे राज्य घडविण्याचे स्वप्न असून ते मी घडविणारच, असा ठाम निर्धार व विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खासदार ओमप्रकाश राजेनिबांळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार ज्ञानराज चौंगुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले,जि.प.उपाध्यक्ष धनजंय सावंत,नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे उस्मानाबाद जिल्ह्यातील मुत्यू दर वाढत असल्यामुळे आवश्यक ती पावले उचलावीत विशेष म्हणजे यापूर्वी तपासणीसाठी इतर जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता ही प्रयोगशाळा सर्व प्रकारच्या तपासणीसाठी उपयुक्त असल्याने जिल्हा स्वावलंबी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी ही प्रयोगशाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी येथील लोकप्रतिनिधी व जनतेची मागणी पूर्ण झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये या प्रयोगशाळेचा जिल्ह्यासाठी नक्कीच फायदा होणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास सर्व देणगीदार साखर कारखाना, सहकारी बॅक, पतसंस्था व कंपनी व्यवस्थापनाचे चेअरमन, प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी मानले.
* प्रयोगशाळेसाठी आर्थिक मदत करणारे
– उस्मानाबाद जनता सहकारी बँक, जिल्हा सहकारी पतसंस्था, फेडरेशन नॅचरल शुगर, धाराशिव शुगर, भाऊसाहेब बिराजदार सहकारी बँक, गोकुळ शुगर, भाई उद्धवराव पाटील सहकारी पत संस्था, बालाजी अमाईन्स, डी मार्ट ,रिन्यू एनर्जी , श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना, उस्मानाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था, उस्मानाबाद जिल्हा पाटबंधारे, कर्मचारी सहकारी पतसंस्था , शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी पतसंस्था, एन साई मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, तामलवाडी इंडस्ट्रियल असोसिएशन, रुपामाता अग्रोटेक व इतर जिल्ह्यातील पतसंस्था सहकारी संस्था व छोट्या-मोठ्या आस्थापनांनी मदत केली.
ही प्रयोग शाळा उभारणीसाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो तसेच कोविड सारखी संकटे येतात आणि जातात संकटात जो पाय रोवून उभे राहतो व पुढे वाटचाल करतो तेच खरे या संकटावर मात करतात. कोरोनामुळे संपूर्ण जग संकटग्रस्त झाले आहे. या संकटात तुम्ही सर्वजण पाय रोवून उभे राहिलात. त्यामुळे तुम्हास मन:पूर्वक धन्यवाद देतो
उद्धव ठाकरे – मुख्यमंत्री