भंडारकवठे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा व सीना नदीकाठी ऊसक्षेत्र व द्राक्षक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. द्राक्ष शेतीपेक्षा ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रासायनिक खताची मोठ्या प्रमाणात गरज असते. परंतु तालुक्यातील अनेक कृषीकेंद्र कोरोना लॉकडाउनच्या नावाखाली युरिया खताचा तुटवडा दाखवत आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कृषी केंद्र हे शेतकऱ्यांची गरज ओळखून युरिया, डीएपी ही रासायनिक खते एफ आर पी पेक्षा जादा दराने चढ्या दराने विक्री करत आहेत. तालुक्यात कृषी विभागाचे दक्षिण सोलापूर, मंद्रुप, वळसंग, व बोरामणी हे ४ कृषि विभागाचे मंडल आहेत. या विभागात एकूण ९० पेक्षा जास्त गावांचा समावेश आहे. या संपूर्ण तालुक्यात १५० पेक्षा जास्त कृषी केंद्र आहेत. परंतु या कृषी केंद्राकडे दक्षिण सोलापूर तालुका कृषी विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. या दुर्लक्षामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक होत आहे.
युरिया या रासायनिक खताची शेतकरी मागणी केली असता शेतकऱ्यांच्या माथी लिंक खते दिली जातात. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. लिंक न घेता युरिया हवे असल्यास जादादराने घ्या, अशी कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. तरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कृषी विभागाने संबंधित कृषी केंद्रांवर कारवाई करून शेतकऱ्यांना रासायनिक खते शासन दराप्रमाणे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.
“शेतकऱ्याने दुकानदारांकडून रीतसर पावती घेवून संबंधित कृषी विभागाकडे तक्रार केल्यास निश्चित कारवाई होईल. गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात कृषी विभागातील कृषी मंडळ अधिकारी, कृषीसाहायक यांना कृषी केंद्राची तपासणी करण्याचे आदेशही दिले आहेत”
पी. के. वाघमोडे – कृषी अधिकारी, दक्षिण सोलापूर तालुका