ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रात काही खासगी कोविड रुग्णालये वाढीव दराने शुल्क आकारणी करीत असल्याच्या तक्रारी वाढत असताना ठाणे महापालिकेने अशाच तक्रारींवरून घोडबंदर भागातील ‘होरायझन प्राइम’ या खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द केली.
होरायझन प्राइम रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने रुग्णांना गैरवाजवी देयके आकारून वसुली केल्याची बाब महापालिकेने नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या प्राथमिक अहवालात उघड झाली आहे. वाढीव देयकांप्रकरणी कोविड रुग्णालयावर कारवाई झाल्याचे हे राज्यातील पहिलेच प्रकरण आहे. मुख्य लेखा परीक्षकांनी रुग्णालय व्यवस्थापनाला २० जुलै रोजी नोटीस बजावून याबाबत दोन दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. रुग्णालयाने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे ही कारवाई केली आहे.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
हे रुग्णालय तसेच शहरातील इतर खासगी कोविड रुग्णालयांमधूनही वाढीव बिलांची आकारणी केली जात आहे, अशा तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्य लेखा परीक्षक आणि ठाण्याचे उपजिल्हाधिकारी यांच्या संनियंत्रणात आयुक्तांनी विशेष लेखा परीक्षक पथक तयार केले होते. या पथकाने ‘होरायझन प्राइम’मधील देयकांची चौकशी केली. या रुग्णालयाने २ एप्रिल ते १२ जुलै या कालावधीत एकूण ७९७ रुग्णांवर उपचार केले. त्यापैकी ५७ देयके लेखा परीक्षणासाठी पथकाकडे सादर करण्यात आली होती. ५६ देयके गैरवाजवी दराने आकारण्यात आल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आली होती. या देयकांची आक्षेपार्ह रक्कम सहा लाख आठ हजार ९०० रुपये इतकी आहे.
* एक महिन्यासाठी नोंदणी रद्द
या रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला असून कोविड रुग्णालयाचा दर्जा कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील पहिले खासगी कोविड रुग्णालय म्हणून ‘होरायझन प्राइम’ रुग्णालयास मार्चमध्ये परवानगी देण्यात आली होती.
* रुग्ण दाखल करण्यास मनाई
होरायझन प्राईममध्ये दाखल असलेल्या रुग्णांवर आयसीएमआर आणि शासन आदेशानुसार औषधोपचार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडून शासकीय दरानुसार शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय, हे रुग्ण बरे होऊन घरी जाईपर्यंत द्विसदस्यीय पथक पूर्णवेळ तैनात करण्यात येणार आहे. या रुग्णालयात आता एकही नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल करून घेतला जाणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.