पुणे : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते ज्येष्ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार (वय – 85) यांना 1 लाख रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरविण्यात आले. पुण्यात त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे यांची उपस्थिती होती.
यावेळी गृहमंत्री देशमुख म्हणाले, आजी या वयातही परिवार चालविण्यासाठी काम करतात. त्यांना शासकीय योजनेतून योग्य ती मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या ‘भरोसा सेल’ मार्फत ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जाते, आतापर्यंत 15 हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारे मदत करण्यात आली आहे.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
पोलीस विभागामार्फत अधिकाधिक मदत देण्याचाही प्रयत्न केला जाणार असलयाचे सांगून जिल्हयातील गणेशोत्सव तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाचा आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शांताबाई पवार यांनी कसरतीचे काही प्रकार करुन आपण या वयातही आरोग्यसंपन्न असल्याचे दाखवून दिले.
* गृहमंत्री देशमुखांनी का केली मदत? काय आहे प्रकरण
गेले दोन दिवस सोशल मीडियावर लाठ्या- काठ्या खेळणाऱ्या आजींचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओची दखल अभिनेता रितेश देशमुख आणि पुण्याच्या आयुक्तांनीही घेतली. पण तुम्हाला माहितेय का त्या आजी कोण आहेत ते. या आजींच नाव आहे शांताबाई पवार. त्या ८५ वर्षांच्या आहेत. या कोरोना काळात आपलं आणि नातंवंडांच पोट भरण्यासाठी या आजीला लाठ्या- काठ्यांचा खेळ रस्त्यावर खेळावा लागत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आजींच्या या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आहेत. या ८५ वर्षीय आजी लाठी- काठीचा खेळ दाखवून पोट भरण्याची वेळ आली आहे. भर पावसात, उन्हात न थांबता पैशासाठी या आजींना हा खेळ खेळावा लागत आहे. या आजी हडपसरमध्ये वैदवाडी गोसावी वस्ती येथे राहतात, त्यांची चार मुलं व सुना यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर १७ नातवंडाची जबाबदारी आली. त्यातील तीन नातवंडांचे त्यांनी काबाड कष्ट करून लग्नही केलं. आता सध्या त्या १४ नातवांचा सांभाळ करत आहेत.