मुंबई : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 5 ऑगस्ट रोजी राममंदिराचं भूमिपूजन होणार आहे. मात्र कोरोनामुळं या भूमिपूजनाला विरोध करत याचिका दाखल करण्यात आली आहे. यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-भूमिपूजन करण्याचा सल्ला दिला आहे. हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथं जाण्याची इच्छा असणार. तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करु शकता, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ‘राममंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला होईल, अशी तारीख जाहीर झाली आहे. आपण त्या भूमिपूजनाला जाणार का?’ असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राममंदिराच्या मुद्द्याला लढ्याची पार्श्वभूमी आहे. ज्याच्यावर बाबराने आक्रमण करुन मशीद बांधली होती. त्याठिकाणी आपण पुन्हा मंदिर उभं करतोय. केवळ भारतातील हिंदूंचं नाही तर जागतिक कुतुहलाचा हा विषय आहे. आज आपल्याकडे कोरोनाचं संकट आहे. त्यामुळं सर्व मंदिरांमध्ये जाण्या-येण्याला बंदी आहे. मी अयोध्येला जाऊन येईन पण लाखो रामभक्त जे उपस्थित राहू इच्छितात, त्यांचं तुम्ही काय करणार? त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार. त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का? कारण हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथं जाण्याची इच्छा असणार. तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करु शकता, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सूचवले.
* मी जाणार, पण अजून तारीख निश्चित नाही
राममंदिर हा भावनेचा प्रश्न आहे. लोक भावनेनं त्या विषयाला जोडले गेले आहेत. त्यांना तुम्ही थांबवणार कसे. माझं येणं-जाणं मी करीन. मी मुख्यमंत्री असल्याने मी जाऊन येईन. अजूनही अधिकृत तारीख आलेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल त्याची कल्पना नाहीय. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, पण लाखो लोकांची जी भावना आहे की तिकडे उपस्थित राहावं. त्यांना तुम्ही कसं अडवणार? कारण तिकडे तो शरयूचा काठच महत्त्वाचा आहे. कारण राममंदिराचं आंदोलन चाललं होतं तेव्हा शरयूसुद्धा लाल झाली होती, रामभक्तांच्या रक्ताने. अशा लाखो, करोडो लोकांच्या भावना निगडित आहेत, असं ठाकरे म्हणाले.