सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर शहरात गेल्या दहा दिवसांपासून लॉकडाऊन घोषित केले होते. दहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर आज सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार असून आज केवळ अत्यावश्यक सेवांसह दूध, किराणा दुकाने सुरू होतील.
पहिल्या टप्प्यात आज सोमवारी भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ, औषधे, रूग्णालये, पेट्रोलपंप सकाळी 7 ते सायंकाळी 7 यावेळेत सुरू राहणार आहेत. दुसर्या टप्प्यात मंगळवारी शहरातील बाजारेपठा पूर्वीच्या नियमाप्रमाणे सुरू राहणार आहेत. मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स वगळून मार्केटमधील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार आहेत. तर तिसर्या टप्प्यात म्हणजेच बुधवारी मार्केट यार्ड सुरू होणार आहे.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही https://t.me/Surajyadigital उपलब्ध)
मंगळवारपासून शहरातील बाजारपेठा पूर्वीच्या नियमानुसार सुरू होणार आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे. भाजीपाला विक्री केंद्रावर एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून शहरातील विविध आठ ठिकाणी खुल्या मैदानात बुधावरपर्यंत भाजीपाला विक्री केंद्रे सुरू केले आहे. शहरात बुधवारपर्यंत सकाळी अकरापर्यंत विजापूर रोड एसआरपी कॅम्प परिसरातील मैदान, पुणे जकात नाका परिसर, तुळजापूर रोड मश्रृम गणपती मंदिरासमोरील मैदान, होटगी रोड सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याजवळील मोकळे मैदान, अक्कलकोट रोड गॅस पंप परिसर, हैदराबाद रोड मंत्री चंडक अंगण मोकळी जागा, देगाव रोड येथील सीएनएस हॉस्पिटल शेजारील मैदानात भाजीपाला बाजार भरविण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले आहेत.
* हॉटेल बंदच; फक्त होम डिलेव्हरी
पूर्वीप्रमाणे हॉटेल बंदच राहणार असले तरी हॉटेलची होम डिलेव्हरी सेवा ही सुरूच राहणार आहे. वस्तूंची दुरूस्ती घरपोच सेवा पध्दतीने सुरू राहणार आहे. औद्योगिक घटक शर्ती व अटीनुसार सुरू राहणार आहेत. महापालिकेने पूर्वी परवानगी दिलेले आणि पूर्वी सुरू केलेली बांधकामे सुरू राहतील. शासकीय कार्यालयातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर ठिकाणी 15 टक्के कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.