सांगली : दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. खासगी रूग्णालयात मोठ्या प्रमाणावर सर्व सोयीयुक्त सुविधा उपलब्ध होण्यावर मर्यादा येत आहेत. कोरोनाबाधित रूग्णांच्या उपचारासाठी वॉलनेस हॉस्पिटल मिरज पुन्हा एकदा ताकदीने उभे राहिले असून सर्व प्रशासन त्यांच्या पाठिशी असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी सांगितले.
तहसील कार्यालय मिरज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, वॉलनेस हॉस्पीटल मिरजचे डॉ. नाथानीयल ससे, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. निरगुंडे, डॉ. दीक्षित, तहसीलदार रणजित देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध
अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम म्हणाले, वॉलनेस हॉस्पिटलमध्ये आवश्यक सर्व यंत्रणा उपलब्ध असून या ठिकाणी कामकाज सुरळीत चालावे, त्यामध्ये कोणती कसूर राहू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासकीय समिती स्थापन केली आहे. कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास गर्व्हमेंट मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स कमिटीमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. ही समिती वेळोवेळी मार्गदर्शन करून आढावा घेणार आहे.
गर्व्हमेंट मेडिकल कॉलेजने वॉलनेस हॉस्पीटलमधील असणाऱ्या सर्व स्टाफला मेडिकल ट्रिटमेंटचा प्रोटोकॉल, कोरोना पेशंट ट्रिट करताना डॉक्टर्स, नर्सेस, शिपाई, स्वच्छता सेवक यांनी स्वत: काय काळजी घ्यावयाची आहे याचे ट्रेनिंग दिले आहे. याशिवाय आवश्यकता असणाऱ्या स्टाफची विशेषत: फिजीशियनच्या बाबतीत महानगरपालिका आयुक्त यांनी मेस्माअंतर्गत आदेश काढले आहेत. तसेच व्हेन्टिंलेटरही उपलब्ध करून दिले आहेत. या हॉस्पीटलमध्ये सध्या एकूण 88 बेडस्ची सुविधा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपलब्ध करून दिली आहे. ती पुढील काळात 100 पर्यंत करण्यात येणार आहे. तसेच या व्यतिरिक्त फिजीशियन असोसिएशनने एमओयु केला असून त्या अंतर्गत कोविड रूग्णांसाठी सशुल्क असे 50 बेडस् ही उपलब्ध आहेत.
यावेळी डॉ. नाथानियल ससे म्हणाले, वॉलनेस हॉस्पीटल मिरजमध्ये कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी आमची सेवा पूर्ण ताकदीने कार्यरत आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या हॉस्पीटलला पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची सेवा करण्याची संधी दिली आहे. आता कोरोनाच्या साथीमध्येही हे हॉस्पीटल महत्त्वपूर्ण योगदान देणार असल्याचे सांगितले.