मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत ५ ऑगस्टला होणाऱ्या भूमिपूजनाला जाणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळायचं आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे हे राम मंदिर भूमिपूजनाला गेल्यास माझी काही हरकत नाही, असं म्हटलं आहे.
शरद पवारांवर राम मंदिरावरील सोलापुरातील वक्तव्यावरुन सर्वञ टीका होत आहे. यातच त्यांनी श्री राम मंदिर भूमिपूजनासाठी मी जाणार नाही कारण महाराष्ट्रातला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. एका माध्यमाच्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राम मंदिराला माझा मुळीच विरोध नाही. राम मंदिर त्या जागी व्हावं अशी संमती सुप्रीम कोर्टाने दिली आहे. अशावेळी विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर मान्यवर जात आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. अयोध्येतल्या जागेवर राम मंदिर उभं राहतंय ही देखील आनंदाची बाब आहे. मात्र मी त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळ्याला जाणार नसल्याचे सांगितले.
राम मंदिर सोहळ्यापेक्षा मला कोरोनामुळे महाराष्ट्रात जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते महत्त्वाचे वाटतात. यानंतर त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की उद्धव ठाकरे जर भूमिपूजन सोहळ्याला गेले तर? त्यावर शरद पवार म्हणाले की उद्धव ठाकरे जर राम मंदिराच्या भूमिपूजनाला गेले तर काहीही हरकत नाही. त्यांनी जरुर जावं, मात्र महाराष्ट्रातला प्रश्न महत्त्वाचा आहे, असं त्यांना वाटलं आणि ते गेले नाहीत तरीही आमचं काहीही म्हणणं नाही. असंही शरद पवार यांनी आवर्जून स्पष्ट केलं आहे.