नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. आता विधानसभा अधिवेशन बोलावण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात जुंपली आहे. गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने विधानसभा अधिवेशन बोलाविण्यासाठी पाठविलेला तिसरा प्रस्तावही राज्यपालांनी परत पाठविला आहे. यामुळे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष आणखी तीव्र झाला असून, गेहलोत यांनी आज राज्यपालांची पुन्हा एकदा राजभवनावर जाऊन भेट घेतली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंत्रिमंडळाने अधिवेशन बोलावण्यासाठी पाठविलेला पहिला प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाने दुसरा प्रस्ताव पाठविला होता. याला राज्यपालांनी उत्तर देऊन त्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आहे. यावर चर्चा करण्यासाठी गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. ही बैठक सुमारे दोन तासांहून अधिक काळ चालली. या बैठकीत विधानसभा अधिवेशन बोलावण्याबाबत नवा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्याचे ठरले. त्यानुसार राज्यपालांकडे अधिवेशन बोलावण्यासाठी तिसरा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला होता.
आता राज्यपालांनी तिसऱ्या प्रस्तावालासुद्धा नकारघंटा कायम ठेवली आहे. या प्रस्तावातही राज्यपालांनी त्रुटी काढल्या आहेत. राज्य सरकारने तातडीने अधिवेशन बोलावण्यासाठी कोणतेही कारण दिलेले नाही. कोणतेही कारण दिलेले नसेल तर २१ दिवस पूर्वसूचना देऊन अधिवेशन बोलवता येईल, असे राज्यपालांनी म्हटले आहे.
राज्यपालांचा तिसऱ्यांदा आलेला नकार पाहून गेहलोत यांनी पुन्हा एकदा प्रेमपत्र मिळाले, अशी टिप्पणी मिश्किलपणे केली. मी आता राज्यपालांसोबत चहा घेण्यासाठी जात आहे, अशी मल्लिनाथीही त्यांनी केला. यानंतर गेहलोत यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. या बैठकीनंतर गेहलोत यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.
* राजस्थान मुख्यमंञ्यांचा मोठा खुलासा
सचिन पायलट आणि बंडखोरांमुळे राजस्थानातील काँग्रेसचे सरकार संकटात सापडले आहे. या सरकारपुढे बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे. मागील काही दिवसांपासून या राज्यातील राजकारण चांगले तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. कॉंग्रेसची मोठी फौजच गेहलोत सरकार कोणत्याही परिस्थितीत वाचविण्यासाठी पुढे आली आहे. पायलट यांनी बंड केल्याने गेहलोत आक्रमक झाले आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये कोणताही संवादच नव्हता, असा खुलासाही खुद्द गेहलोतांनीच केला आहे.