बार्शी : वैराग पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तडजोडीने 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या पो.कॉ. इसामियाँ बाशामियाँ बहिरे याची न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली. त्याने भ्रष्ट मार्गाने मिळविलेल्या अपसंपदेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने सुरु आहे.
बार्शी तालुक्यातील ढोराळे येथील एका कुटुंबात झालेल्या भांडणाबद्दल वैराग पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास हवालदार गोटे यांच्याकडे आहे. इसामियॉं बहिरे हा वैराग पोलिस ठाण्यातर्गंत शेळगाव बीटमध्ये मदतनीस म्हणून कार्यरत आहे. त्याने या प्रकरणातील अरोपीला मदत करतो तसेच यापुढे कोणतीही कारवाई होवू देत नाही, असे तपासाधिकार्याला सांगतो, असे म्हणून अरोपीकडे प्रथम 15 हजार रुपयाची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड करुन अखेर 5 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरविले होते.
या आरोपीला लाच द्यावयाची नव्हती. त्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. वैराग येथे सापळा रचून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यावेळी बहिरे बिनदिक्कतपणे लाच मागत असल्याचे आढळून आले. त्यामुळे ठरविलेल्या ५ हजार रुपयापैकी 3 हजार रुपये वैराग पोलिस ठाण्याच्या आवारात आरोपीकडून स्वीकारताना त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. जगदीश भोपळे, कविता मुसळे, नाईक चंगरपल्ले, स्वामी, सण्णके, कॉ. सुरवसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरोपी बहिरे यास आज येथील सत्र न्यायलयात हजर करण्यात आले असता सरकारी वकिल ॲड. दिनेश देशमुख यांनी या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहेत का? ज्या गुन्ह्यात मदत करण्याचे आश्वासन अरोपी याने दिले होते, त्या गुन्ह्याचा तपास असलेल्या हवालदार गोटे यांच्याशी अरोपीची रुजवात घालावयाची आहे. तसेच बहिरे याने अवैध मार्गाने अपसंपदा कमविली आहे का? याची चौकशी करण्याकरीता पोलिस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी मंजूर केली. अरोपी बहिरे हा मूळचा परंडा येथील असून त्याने यापूर्वी बार्शी पोलिस ठाण्यातही सेवा बजाविलेली आहे. तो सध्या बार्शी येथील पोलिस वसाहतीतच राहण्यास आहे.