लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यामध्ये सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर याचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक नेते पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, पोलिस त्यांना भेटू देत नाहीत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ आज तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळाला उत्तर प्रदेश पोलिसांनी भेट घेण्यापासून रोखलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज गांधी जयंती तृणमूल नेते डेरेक ओब्रायन यांनाही उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखलं. पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले. झटापटीत डेरेक ओब्रायन खाली कोसळले. काल राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला जात असताना त्यांना मज्जाव करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की देखील केली.
दरम्यान, तृणमूलच्या नेत्या ममता ठाकूर म्हणाल्या, ‘आम्हाला पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू दिलं नाही. आम्ही भेटण्यासाठी आग्रह धरला. मात्र, महिला पोलिसांनी खासदार प्रतिमा मोंडल यांनाही धक्का दिला. त्या खाली कोसळल्या. पुरूष पोलिसांनीही त्यांना ढकलले. हे लज्जास्पद आहे’.
मात्र, आपण पीडित कुटुंबीयांना भेटणारच अशी ठाम भूमिका डेरेक ओ ब्रायन यांनी घेतली, त्यामुळे तणाव निर्माण झाला, यात त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली.
पोलिसांनी हाथरसमध्ये जाण्यास मज्जाव केला आहे. राजकीय नेतेच नाही तर प्रसार माध्यमांना देखील याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.