पटना : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या बैठकींच्या फेऱ्या सुरू आहेत. एनडीए आणि महाआघाडी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अजूनही सूटलेला नाही. एलजेपीच्या नाराजीमुळे एनडीएतील जागा वाटपाचं सूत्र अडलं आहे. चिराग पासवान यांना जास्त जागा हव्या आहेत. आज शनिवारी एलजेपीची बैठक होणार आहे. निवडणुकीपूर्वी एलजेपीची ही शेवटची बैठक असेल.
या बैठकीत सर्व 143 उमेदवारांवर चर्चा होईल. म्हणजेच, एलजेपी 143 जागांवर उमेदवार उभे करू पाहत आहे. अशा परिस्थितीत ती एनडीएपासून विभक्त झाली तरी आश्चर्य वाटायला नको. आज एलजेपीने नितीश सरकारवर टीका केली आहे. पक्षाने म्हटले आहे की, नितीश सरकारचा सात-निश्चयांचा अजेंडा भ्रष्टाचाराची पेटी आहे. बिहार सरकारच्या अजेंडा कार्यक्रम एलजेपीला मान्य नाही.
भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जहाज फुटीच्या खडकावर आदळणार की काय असे चित्र आहे. शिवसेना एनडीएतून केव्हाच बाहेर पडली. कृषी विधेयक 2020 मुळे पंजाबमधील शिरोमणी अकाली दल बाहेर पडला. आता बिहार विधानसभा निवडणूक 2020 मध्ये रामविलास पासवान यांचा चिराग पासवान यांच्या नेतृत्वात असलेला लोक जनशक्ती पक्ष एनडीएतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. विधानसभा निवडणुकीत बिहारच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ होताना दिसत आहे. आघाडी, बिघाडी, स्वबळ, विरोधकांशी हातमिळव अशा अनेक गोष्टी घडत आहेत.
सूत्रांची माहिती अशी की बिहार विधानसभा निवडणूक 2020 लोक जनशक्ती एनडीएतून बाहेर पडत स्वबळावर लढवण्याची शक्यता आहे. लवकरच त्याबाबत घोषणा केली जाऊ शकते. सूत्रांनी असेही म्हटले आहे की, एलजीपीला भाजपसोबत काहीही अडथळा नाही. एलजीपीला नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलासोबत आक्षेप आहे. त्यामुळे या निवडणुकीत एलजेपी केवळ एनडीएचे घटक पक्ष असलेल्या जेडीयू आणि हिन्दुस्तान अवाम मोर्चा (हम) विरोधात आपले उमेदवार उतरवाणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लोक जनशक्ती पक्षाच्या (एलजीपी) कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे की, पक्षाने आता स्वबळ आजमावावे. पक्षाने किमान 143 जागा लढवाव्यात. पक्षातील नेते सांगतात की, पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याला विचारले तर, ते आता आघाडी करुन लढायलाच नको म्हणत आहेत. जे काही लढायचे ते स्वतंत्र लढूया असे त्यांचे म्हणने आहे,असे हे नेते सांगतात. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांना भाजपसोबत कोणतीच अडचण नाही. परंतू, त्यांना नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल आणि जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा पक्षाशी अडचण आहे. असे असले तरी कार्यकर्त्यांनी चिराग पासवान जो अंतिम निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, लोजपा (लोकजनशक्ती पार्टी) नेतृत्वाने जवळपास हे नक्की केले आहे की, बिहार विधानसभा निवडणुकीत सन्मानजनक जागा मिळाल्या तरच एनडीएमध्ये राहायचे. जर सन्मानजनक जागा मिळत नसतील तर एनडीएसोबत राहण्यात काहीच अर्थ नाही. एनडीएतून बाहेर पडायचे. केवळ 42 जागांवर चर्चा पुढे जाऊ शकत नाही. लोकजनशक्ती पक्षाला अधिक जागा हव्या आहेत. जागांबाबत तडजोड करण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वावर आहे. परंतू, पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे म्हणने आहे की, पक्षाने 143 जागा लढाव्यात. त्यामुळे येत्या काळात एलजीपी काय निर्णय घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.