सोलापूर : सोलापूर जिल्हा महसूल प्रशासनातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या पाच व तहसीलदार दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या महसूल विभागाने केल्या आहेत. बार्शी व माळशिरस या तालुक्यांना नवीन तहसीलदार मिळाले असून सोलापूर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांची पुन्हा सोलापूर जिल्ह्यात बदली झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भूसंपादन क्रमांक एकचे अधिकारी दीपक शिंदे यांची बदली दक्षिण सोलापूर व अक्कलकोटच्या प्रांत अधिकारी पदी झाली आहे. निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांची बदली पुणे येथे भूसंपादन अधिकारी पदी झाली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांची बदली पुणे जिल्ह्यात पुनर्वसन अधिकारी म्हणून झाली आहे.
रोजगार हमी शाखेचे उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांची बदली पुणे जिल्ह्यातील खेड-राजगुरुनगरचे प्रांताधिकारी पदी झाली आहे. सोलापुरातील भूसंपादन क्रमांक सातचे अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांची बदली सातारा जिल्ह्यातील माण-खटावच्या प्रांताधिकारी पदी झाली आहे.
* नव्याने तीन उपजिल्हाधिकारी
सोलापूर जिल्ह्यात नव्याने तीन उपजिल्हाधिकारी आले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल शाखेचे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षिरसागर यांची बदली सोलापुरात भूसंपादन अधिकारी क्र. 11 याठिकाणी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांची बदली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक शाखेत झाली आहे. साताऱ्याच्या भूसंपादन अधिकारी डॉ. रेखा सोळंके यांची बदली सोलापूरच्या भूसंपादन अधिकारी क्रमांक एक पदी झाली आहे. सोलापुरातील निवडणूक शाखेचे तहसीलदार दगडू कुंभार यांची बदली मिरजच्या तहसीलदारपदी झाली आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या महसूल शाखेतील तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली सोलापूर शहरातील अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयात झाली आहे.